शिक्रापूर पोलिसांची वाहतूककोंडीप्रश्नी बैठक
By Admin | Updated: June 18, 2015 22:39 IST2015-06-18T22:39:16+5:302015-06-18T22:39:16+5:30
पुणे-नगर रोडवरील शिक्रापूर येथे होणाऱ्या वाहतूककोंडीचा प्रश्न वाढत असताना विविध संघटनेने येथे सिग्नल बसविण्यासाठी

शिक्रापूर पोलिसांची वाहतूककोंडीप्रश्नी बैठक
शिक्रापूर : पुणे-नगर रोडवरील शिक्रापूर येथे होणाऱ्या वाहतूककोंडीचा प्रश्न वाढत असताना विविध संघटनेने येथे सिग्नल बसविण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर येथील पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून, वाहतूक समस्या सोडविण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी रोडलगतच्या व्यापाऱ्यांची बैठक घेतली. तर वाहतूक नियमनासाठी मुख्यालयाने आठ अतिरिक्त पोलीस कर्मचारी शिक्रापूर पोलीस ठाण्याला दिले.
पुणे-नगर रोडवर शिक्रापूर पोलीस ठाण्यांतर्गत शिक्रापूर-चाकण चौक, शिक्रापूर-पाबळ चौक, कोरेगाव-केंदूर चौक, कोंढापुरी, सणसवाडी आदी भागांत दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. पोलीस स्टेशनपासूनच अर्धा किमी अंतरापर्यंत दररोज ट्रॅफिक जॅमला सुरुवात होत असते. मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेल्या शिक्रापूर परिसरात कामगारवर्ग त्रासला आहे. मागील वर्षी कंपन्यांनी वॉर्डनची नेमणूक केली होती. तात्पुरती उपाययोजना होऊन पुन्हा जैसी थी स्थिती झाली. यावर उपाययोजना आखण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी व्यापाऱ्यांची बैठक घेतली. गावातील रस्त्याच्या कडेला लावली जाणारी वाहने बेशिस्तपणे लावू नये. तसेच व्यापाऱ्यांनी ग्राहकांना गाड्या योग्य पद्धतीने लावण्याच्या सूचना कराव्यात, असे पोलिसांनी सांगितले. या वेळी पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, अनिल जगताप, संदीप जगदाळे, शिक्रापूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शहाणे, सचिव लद्दाराम पटेल, निखिल साकोरे, बाबा चव्हाण, उमेश भुजबळ, हर्षल पाबळे, रामदास सातकर, किरण पुंडे, कामेश थोरवे, जितेंद्र थोरवे उपस्थित होते.