रमा तुपेरे... अप्पर इंदिरानगर परिसरात राहते. ‘कळत्या वयाची झाले तेव्हापासून कष्टच उपसते...’ रमा तिच्या कष्टाच्या प्रवासाची सुरुवातच या वाक्याने करते. तिचं अगदी लहान वयातच लग्न झालं. शाळेतून काढलं अन् बोहल्यावर चढवलं. एकापाठोपाठ तीन मुले झाली आणि ७-८ वर्षांच्या संसारातच पतीचे निधन झाले. लहानगं लेकरू कंबरेवर होतं तेव्हा ती अवघी १८-१९ ची होती. लग्नाआधी अन् नंतरही ती कचरा वेचण्याचं काम करत आहे. कचराकुंडीजवळ मुलांना बसवून कचरा गोळा करायचा, भंगार आहे का बघायचं. त्यानंतर घंटागाडीवर काम करू लागली. दारोदार जाऊन कचरा वेचायचा. पती गेला; पण कोणीही नातेवाईक वा सासरचे मदतीला नाही आले. एक तप उलटले.. ती कचऱ्यात स्वत:च्या मुलांचे भवितव्य शोधतेय. तिची मुलं आता १४, १२, ६ वर्षांची आहेत. शाळेत जातात...‘‘आपण जे भोगलं. ते मुलांच्या वाट्याला कधीच नको, म्हणून शिकवायचं, घरखर्च कमी करून मुलांच्या शिक्षणपाण्याचं बघते. उधारीसुद्धा चुकवावीच लागते, त्यापेक्षा कष्टच उपसायचे. कचरा वेचताना खूप अवघडल्यासारखं होतं. बरोबरीच्या मुली हसतात, किती लहान असताना लग्न झालं म्हणून. पण यापुढे मुलांना शिक्षण देऊन स्वत:ची ओळख करायचीय...’’ इति रमा.सुरेखा... पद्मावतीला राहते. पतीचे क्षयरोगाने दहा वर्षांपूर्वी निधन झाले. तिला २ मुली, १ मुलगा आहे. आपण एकटे आहोत तर कोणी मदतीला येईल, असं कधीच होत नाही. आपल्यालाच कष्ट घ्यावे लागतात. लग्नाच्या आधी पण कष्ट होतेच, नवऱ्याघरी पण गरिबी होती. त्यामुळे घर चालवायला कंबरमोड होईतो काम करावंच लागलं. नवऱ्याची साथ सुटली तसा कोणाचाही आधार नाही. मुलींना काय शिकवायचं, असं म्हणणारे पण खूप भेटले; पण तिला मुलींना शिकवायचंय... ‘‘मुली आहेत; पण शिक्षण सोडून धुण्याभांड्याला लावायचं नाहीये. उलट मला जे काही भोगावं लागतंय, ते त्यांच्या वाट्याला नको. मी कष्ट करून त्यांना शिक्षण देणार. मोठं नावं कमवावं अन् आॅफिसातील काम करावं, अंगमेहनतीचं नाही. एवढीच अपेक्षा आहे.’’ शोभा ढगे... सुंदराबाई शाळा, आंबेडकर वसाहत, चंदननगरला राहते. २ मुले, १ मुलगी आहे. १० वर्षांपूर्वीच नवऱ्याने दुसरा घरोबा केलेला आहे. त्यामुळे तिला घराबाहेर पडावेच लागते. पूर्वी काच पत्रा पंचायतीत जायची. मग नंतर कचरागाडी घेऊन कचरा गोळा करायला जाऊ लागली. सहा महिन्यांचं लेकरू पदरात असताना तिच्या नवऱ्याने तिला सोडून दुसरं लग्न केलं. त्यामुळे लेकराबाळांसाठी तिला कचरा वेचण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. दीड वाजेपर्यंत कचरा गोळा करायचं. मग कोणी धुणी, भांडी किंवा चपात्या लाटायला लावल्या तर तेही आनंदानं करायचं, तेवढेच चार पैसे येतात म्हणून कधीच कोणत्याच कामाला नाही म्हणायचं नाही. हे ठरवूनच टाकलेलं. कचऱ्यातून भंगार शोधायचं. त्याचेही महिन्याकाठी शे-पाचशे रुपये मिळतात. मुलांना मात्र तिला शिकवायचंय. पहिला मुलगा ८वीत आहे. ‘‘माझी सहनशक्ती आहे तोपर्यंत कष्ट उपसायचे अन् मुलांना शिकवायचे. नवरा एक रुपया देत नाही म्हणून गप्प बसून कसं चालणार, मुलांसाठी उभं राहायचं. मुलांना पण आता कळतं. आई गं नको इतकं राबू, असं म्हणतात तेच पुरं होतं. पण मुलांना शिकवून मोठं करायचं हे नक्की.’’
कष्टाच्या सोन्यातून ‘ती’ने उजळला संसार
By admin | Updated: October 24, 2014 05:09 IST