‘सावली’ने लावले २२ लेकींचे लग्न !
By Admin | Updated: July 12, 2015 00:13 IST2015-07-12T00:13:39+5:302015-07-12T00:13:39+5:30
मुली नको म्हणून स्त्रीभ्रूण हत्या करण्याची मानसिकता वाढत असताना येथील एका स्वयंसेवी संस्थेने अनाथ मुलींचे संगोपन करुन त्यांना समाजात आधार मिळवून दिला.

‘सावली’ने लावले २२ लेकींचे लग्न !
- महेंद्र कांबळे, बारामती
मुली नको म्हणून स्त्रीभ्रूण हत्या करण्याची मानसिकता वाढत असताना येथील एका स्वयंसेवी संस्थेने अनाथ मुलींचे संगोपन करुन त्यांना समाजात आधार मिळवून दिला. या संस्थेने एक-दोघींना नव्हे तब्बल २२ लेकींना लहानचे मोठे करत त्यांचे विवाह लावून दिले. आजही या संस्थेच्या अंगणात पंचवीसहून अधिक मुले-मुली बागडताहेत.
सावली अनाथालयाचे संस्थापक महेश अहिवळे, त्यांची पत्नी झरीना यांनी अनाथ मुलामुलींचे पालकत्व घेतले. समाजकार्याची (एमएसडब्ल्यू) पदवी घेतल्यानंतर दोघांनीही स्वयंसेवी संस्थांमध्ये नोकरी स्वीकारली. पण, काही वर्षांनी स्वत:ची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच येथे १९९७-९८ मध्ये सावली अनाथालय सुरू झाले.
जळोची भागातील एका छोट्या खोलीत त्यांनी अनाथांचे संगोपन सुरू केले. या कामासाठी पुढे त्यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इमारत मिळवून दिली. सुनेत्रा पवार यांनीही हातभार लावला.
आज ‘सावली’च्या माध्यमातून अहिवळे यांनी २२ मुलींचे शिक्षण पूर्ण करून त्यांचे विवाह लावून दिले. दरवर्षी दिवाळीला या लेकी आवर्जून माहेरी म्हणजे ‘सावली’त येतात. जावईबापूही येतात. तेव्हा सावलीचे गोकुळ गजबजून जाते. निराधार, आई वडिलांचे छत्र हरपलेले, पालक व्यसनाधीन आहेत अशा अनेक मुलांना या संस्थेने पोटाशी कुरवाळत त्यांना मायेची उब दिली. आम्ही अनाथांचे आई, बाबा झालो. देणगीसाठी कधी कोणाकडे गेलो नाही. पण, अनेकांनी मदतीचा हात पुढे केला, त्यातूनच सावली उभी राहिली, अशी कृतज्ञता हे दाम्पत्य व्यक्त करते.