टंचाईच्या झळा झाल्या तीव्र
By Admin | Updated: May 11, 2017 04:09 IST2017-05-11T04:09:07+5:302017-05-11T04:09:07+5:30
आंबेगाव तालुक्यात पाणीटंचाईची समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे. तालुक्याच्या आदिवासी भागातील डोंगरमाथ्यावरील

टंचाईच्या झळा झाल्या तीव्र
लोकमत न्यूज नेटवर्क
डिंभे : आंबेगाव तालुक्यात पाणीटंचाईची समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे. तालुक्याच्या आदिवासी भागातील डोंगरमाथ्यावरील गावे व वाड्या-वस्त्यांवरील पाणीसाठे कोेरडे पडू लागल्याने मागील काही वर्षांच्या तुलनतेत या वर्षी पाणीटंचाईच्या झळा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. दिवसागणिक वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे माणसांबरोबरच पशु-पक्ष्यांचाही घोटभर पाण्यासाठी जीव कासावीस होत आहे.
दिवस असो की रात्र डोक्यावर हंडे घेऊन बाया-बापड्यांना हंडाभर पाणी मिळविण्यासाठी अनवाणी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. पाण्यासाठी रात्रीचा दिवस होऊ लागला असून पाणी टिपण्यासाठी आदिवासींचे झऱ्यांवर हेलपाटे सुरू झाले आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात यंदा मागील
काही वर्षांच्या तुलनेत पाणीटंचाई वाढली आहे. जसजशी उन्हाची
तीव्रता वाढू लागली आहे. तसतसे आंबेगाव तालुक्यात पाणीटंचाईची समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे. विशेषकरून तालुक्याच्या आदिवासी भागातील डोंगरमाथ्यावरील गावे व
वाड्या-वस्त्यांवरील आदिवासी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा यंदा सहन कराव्या लागत आहेत.
या भागातील नैसर्गिक पाणवठे आटल्याने माणसांबरोबरच जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही पाणवठ्यांवर जेमतेम शिल्लक असणारे पाणीही दूषित झाले आहे. या पाण्यामुळे आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्नही अजून एक समस्या निर्माण झाली आहे. दूषित पाण्यामुळे जुलाब, उलट्या, तसेच बॅक्टेरियामुळे आजारी पडलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.
आदिवासी भागातील पाटण खोऱ्यातील कुशिरे, महाळुंगे, दिगद, मेघोली, पिंपरी, व या गावच्या आदिवासी वाड्या-वस्त्या, तर आहुपे खोऱ्यातील बोरघर, घोटमाळ, वरसावणे, डोंगरावरील वाड्या-वस्त्या, तीरपाड, कोंढरे, पिंपरगणे, नानवडे, न्हावेड, भोईरवाडी या गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काळबांध, उगलेवाडी, गोहे गावच्या डोंगरमाथ्यावरील उपळवाडी, सायरखळा, उभेवाडी, गाडेकरवाडी तसेच पोखरीची बेंढारवाडी जांभोरीच्या गावच्या आदिवासी वाड्या-वस्त्या या भागात सध्या तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे.