हिस्सेदाराने केला आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: October 16, 2016 03:51 IST2016-10-16T03:51:40+5:302016-10-16T03:51:40+5:30
पोलीस बंदोबस्तात शेतजमिनीची शासकीय मोजणी सुरू असताना भूमापन गटातील हिस्सेदाराने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने शासकीय

हिस्सेदाराने केला आत्महत्येचा प्रयत्न
लोणी काळभोर : पोलीस बंदोबस्तात शेतजमिनीची शासकीय मोजणी सुरू असताना भूमापन गटातील हिस्सेदाराने अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने शासकीय भूकरमापकांना मोजणीचे काम अर्धवट स्थितीत सोडावे लागले. या वेळी झालेल्या धावपळीत भूकरमापकाच्या अंगावरही रॉकेल पडल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.
आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल न करता लोणीकंद पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका बजावली आहे. ही घटना कोलवडी (ता. हवेली) येथे घडली.
कोलवडी येथील गट क्रमांक ८०० मधील क्षेत्र एका बांधकाम व्यावसायिकास विकसनासाठी दिले आहे. त्याने कुलमुखत्यारपत्राच्या आधारे शासकीय मोजणी मागवली होती. या मोजणीस जमिनीच्या मूळ मालकांपैकी एका सहहिस्सेदाराचा आक्षेप होता. त्यामुळे त्याचा या प्रक्रियेस विरोध होता. त्या ठिकाणी भूकरमापक ए. सी. वचने, प्रवीण झगडे, मदतनीस, अर्जदार, दोन पोलीस कर्मचारी व एक महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
विरोध नोंदवूनही मोजणीचे काम सुरूच राहिल्याने सहहिस्सेदाराने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.
या धावपळीत उपस्थित भूकरमापकाच्या अंगावरदेखील रॉकेल सांडले. इतरांनी वेळीच प्रसंगावधान ओळखून हस्तक्षेप करीत पुढील धोका टाळला गेला. लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी फोन न उचलल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
(वार्ताहर)
कोलवडी येथील गट क्रमांक ८०० मध्ये शासकीय मोजणी सुरू असताना एकाने पोलिसांसमोर अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने मोजणी थांबवली असून या प्रकरणाची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असून तसा अहवाल सादर केला आहे.
- प्रवीण झगडे,
भूकरमापक हवेली