शारदा-गणेशाची आभूषणे चोरणारा सापडला
By Admin | Updated: July 10, 2015 02:44 IST2015-07-10T02:44:26+5:302015-07-10T02:44:26+5:30
अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाच्या मूर्तीवरील ४४ लाखांची आभूषणे लंपास करणाऱ्या चोरट्याला शिवाजीनगर न्यायालयातील पोलिसांनी गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पकडले.

शारदा-गणेशाची आभूषणे चोरणारा सापडला
पुणे : अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाच्या मूर्तीवरील ४४ लाखांची आभूषणे लंपास करणाऱ्या चोरट्याला शिवाजीनगर न्यायालयातील पोलिसांनी गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पकडले. न्यायालयामधील एका इमारतीमध्ये नळ चोरत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने त्याला पकडले. मंदिरात चोरी करणारा हाच चोरटा असल्याचे लक्षात आल्याबरोबर त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, आरोपीच्या वडिलांनी गुरुवारी सकाळी कोथरूड पोलीस ठाण्यात चोरीच्या दागिन्यांपैकी काही दागिने स्वत: आणून जमा केले. तानाजी नारायण कुडले (वय ३५, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे अटक आरोपीचे नाव आहे. शिवाजीनगर न्यायालय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल मंडई मंडळाच्या मंदिरामध्ये दागिन्यांची चोरी झाल्याची माहिती मिळाल्यावर न्यायालयातील पोलिसांनीही खबऱ्यांकडून माहिती घ्यायला सुरुवात केली होती. न्यायालयातील पोलीस कर्मचारी संजय असवले, मयूर भोकरे, प्रशांत पालांडे, प्रताप बिरंजे, अनंत ढवळे, प्रफुल्ल साबळे हे न्यायालयाच्या गेट क्रमांक एक समोरील इमारतीमध्ये गस्त घालीत होते. इमारतीच्या छतावर एका ठिकाणी कुडले नळ चोरत असल्याचे त्यांना दिसले. त्याचे निरीक्षक केले असता सीसीटीव्ही फुटेज आणि रेखाचित्रमधील आरोपी हाच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने निरीक्षक सचिन सावंत यांना माहिती दिली. सावंत, असवले यांनी त्याला विश्रमबाग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कुडले हा पुर्वी न्यायालयामध्ये प्लंबिंगची तसेच साफसफाईची कामे करीत होता. त्याला विविध प्रकारची व्यसने आहेत. आईवडील, पत्नी आणि मुलांसह तो राहतो. त्याची पत्नी धुण्याभांड्याची कामे करते तर वडील रिक्षाचालक आहेत. सध्या तो काम करीत नसून भुरट्या चो-या करीत असल्याची माहिती विश्रमबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत भट यांनी दिली.