पुणे : कोरेगाव भीमा येथील दंगल ठराविक लोकांनी घडवून आणली असून यासंदर्भात विशेष तपासणी पथकाकडून चौकशी करावी, अशा स्वरूपाचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते. अशा स्वरूपाची बातमी पुण्यातील एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. या बातमीच्या आधारे हे पत्र तथ्यांची पुष्टी करण्यासाठी आयोगाकडे उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा आयोगाकडे केली आहे. पुढील सुनावणी ३० एप्रिल रोजी होणार आहे. या सुनावणीला शरद पवार यांनाही हजर राहण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आंबेडकर यांची कोरेगाव भीमा आयोगासमोर बुधवारी (दि. २३) सुनावणी झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सुनावणीत यापूर्वी उल्लेख न केलेल्या बाबीचा आंबेडकर यांनी आयोगाकडे खुलासा केला. आंबेडकर यांनी पुण्यातील एका वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीचा हवाला देत शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. या बातमीच्या हवाल्याने शरद पवार यांनी ही दंगल घडवून आणलेली दंगल असून याबाबत त्यांना कल्पना आहे, त्यानुसार पवार यांनी या घटनेची विशेष तपासणी पथकाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली असा आहे, असे त्या बातमीत उल्लेख होता, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. आयोगाच्या सुनावणीत यापूर्वी हा मुद्दा कधीही आलेला नव्हता.
चौकशी आयोगासमोर हा मुद्दा महत्त्वाचा असून शरद पवार यांनी ठाकरे यांना लिहिलेले पत्र आयोगाकडे असावे. त्यासाठी आयोगाने शरद पवार यांना हजर होण्यासाठी समन्स बजावावे. येत्या ३० एप्रिलला त्यांची उलटतपासणी करावी, अशी मागणीही आंबेडकर यांनी यावेळी केली. आयोगाने ही बाब मान्य केली असून हे पत्र जमा करण्यासंदर्भात आयोगाचे समन्स एक-दोन दिवसांत निघेल. ३० तारखेला पवार यांना बोलावले जाईल, अशी माहिती आंबेडकर यांनी दिली.