पुणे (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांच्या पुढील चार दिवसांतील सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पवार यांना खोकल्यामुळे बोलण्यात त्रास होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
८४ वर्षीय शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. मात्र, त्या भाषणादरम्यान त्यांना वारंवार खोकल्याचा त्रास होत असल्याचे दिसून आले. तब्बल १८ मिनिटांच्या भाषणादरम्यान पवार यांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे प्रकर्षाने जाणवले.
“खोकल्यामुळे बोलण्यात अडचण होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवार साहेबांनी चार दिवस सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे,” असे जगताप यांनी स्पष्ट केले.
शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत. त्यांची प्रकृती ठीक व्हावी, यासाठी त्यांच्या समर्थकांकडून प्रार्थना केल्या जात आहेत. पवार यांच्यावर लवकरात लवकर उपचार करून त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला गेला आहे, असेही पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, पवार यांच्या आगामी सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नव्याने नियोजन करण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.