पुस्तकांच्या गावाला येणार 'आकार'; सातारा जिल्ह्यातील 'भिलार'चा करणार नियोजनबद्ध विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:02 PM2017-12-21T12:02:30+5:302017-12-21T12:15:15+5:30

भारतातील पहिले पुस्तकांचे गाव ठरलेल्या भिलारचा विकास आता नियोजनबद्ध पद्धतीने केला जाणार आहे. या गावाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले असल्याने पुस्तकांच्या गावाला आकार येणार आहे.

'Shape' will come in the village of books; Planned development of Bhilar in Satara district | पुस्तकांच्या गावाला येणार 'आकार'; सातारा जिल्ह्यातील 'भिलार'चा करणार नियोजनबद्ध विकास

पुस्तकांच्या गावाला येणार 'आकार'; सातारा जिल्ह्यातील 'भिलार'चा करणार नियोजनबद्ध विकास

Next
ठळक मुद्देआराखड्यामध्ये केला जाईल आवश्यक सर्व सोयीसुविधांचा विचारसंपूर्ण गावाचा तयार केला जाणार स्वतंत्र नकाशा

राजानंद मोरे
पुणे : भारतातील पहिले पुस्तकांचे गाव ठरलेल्या भिलारचा विकास आता नियोजनबद्ध पद्धतीने केला जाणार आहे. या गावाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले असल्याने पुस्तकांच्या गावाला आकार येणार आहे. गावातील रस्ते, घरांची बांधणी, पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृह यांसह गावाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक सर्व सोयीसुविधांचा विचार या आराखड्यामध्ये केला जाईल.
महाराष्ट्रात वाचनसंस्कृतीची नवी सुरुवात करण्याच्या उद्देशाने, स्ट्रॉबेरीचे गाव अशी ओळख असलेल्या भिलारमध्ये भारतातील पहिले पुस्तकांचे गाव साकारण्यात आले आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीच्या जवळ असलेल्या या गावाला आता नवी ओळख मिळाली आहे. या पुस्तकांच्या गावात घरे आणि सार्वजनिक जागा अशा निवडक २५ ठिकाणी सुमारे १५ हजार पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वाचनाचा आनंद लुटता यावा आणि साहित्यविश्वाची सफर घडावी, यासाठी भिलार गावात सार्वजनिक वाचनालयाची चळवळ उभी राहिली आहे. ही चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी भिलारला नियोजनबद्ध आकार दिला जाईल.
भिलारमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनाकडून विकास आराखडा तयार केला जाणार आहे. याची जबाबदारी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील नगररचना विभागाचे समन्वयक डॉ. प्रताप रावळ यांच्यावर सोपविण्यात आली आहे. गावामध्ये येणारा प्रमुख रस्ता खूपच छोटा आहे. या रस्त्याची रुंदी सात ते साडेसात फुटांपर्यंत वाढविण्याचा विचार आहे. तसेच अंतर्गत रस्ते, पार्किंगची व्यवस्था, स्वच्छतागृहे, गटार व्यवस्था, गावातील सुशोभीकरण, पाण्याचा निचरा, निवासाची व्यवस्था यांसह विविध बाबींचा विचार आराखड्यात केला जाणार आहे. गावात आल्यानंतर पर्यटकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. त्यासाठी कोणतेही अडथळे येऊ नयेत, अशी भूमिका आहे. 

बंधने घरांच्या बांधकामावरही 
भिलार गावातील घरांची बांधकामे करताना यापूर्वी कोणतेही नियोजन केल्याचे दिसत नाही. त्यामुळे यापुढील काळात होणाऱ्या बांधकामांवर काही बंधने आणली जाऊ शकतात. 
ही घरे निसर्गपूरक असतील. त्यासाठी आराखडा तयार करताना नियमावलीही तयार केली जाऊ शकते. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ग्रांमपचायतीवर राहील.

सध्या भिलार गावाचा केवळ ब्रिटिशकालीन नकाशा उपलब्ध आहे. मात्र, त्यामध्येही केवळ सर्व्हे नंबर असून त्याचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे संपूर्ण गावाचा स्वतंत्र नकाशा तयार केला जाणार आहे. त्यानुसार रस्ते, इमारतींचे बांधकाम तसेच इतर सोयीसुविधांचा शास्त्रीय आराखडा तयार करून शासनाला सादर केला जाईल. पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आराखड्यात मांडणी केली जाईल.
- डॉ. प्रताप रावळ, समन्वयक, नगररचना विभाग, सीओईपी
 

Web Title: 'Shape' will come in the village of books; Planned development of Bhilar in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे