शाहिरी कलेलाच आली अवकळा

By Admin | Updated: February 4, 2015 00:34 IST2015-02-04T00:34:25+5:302015-02-04T00:34:25+5:30

रोमांचक कवनांद्वारे शाहिरांनी एक काळ जागविला. सळसळते चैतन्य निर्माण करणारी शाहिरीकला आज लोप पावत चालली आहे की काय,

Shahiri was the only one to come | शाहिरी कलेलाच आली अवकळा

शाहिरी कलेलाच आली अवकळा

प्रसन्न पाध्ये - पुणे
त्रिवार करुन जयजयकार,
योगीराज थोर शाहीर आतूर,
डफावर चढे साज शौर्याचा
शिवाजी पुत्र महाराष्ट्राचा,
छत्रपती डंका चहुमुलखीचा
या आाणि अशा रोमांचक कवनांद्वारे शाहिरांनी एक काळ जागविला. सळसळते चैतन्य निर्माण करणारी शाहिरीकला आज लोप पावत चालली आहे की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात अभावानेच होणारे शाहिरीचे कार्यक्रम त्यामुळे कुटुंब पोसायचे कसे असा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे केवळ शासकीय योजनांची माहिती गावोगाव पोहोचविण्यासाठी हे शाहीर प्रयत्न करीत असून, पोटाळी खळगी भरत आहेत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज शंभरावर फड आहेत. तर शाहिरांची संख्या पाच हजारांच्या घरात आहे. शिवजयंतीलाच या शाहिरांच्या कलेचा कान केला जातो इतर वेळी मात्र या कलाकारांकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही, अशी सध्या परिस्थिती आहे. प्रबोधन करणे हा शाहिरी कलेचा मुख्य उद्देश. १२व्या शतकापासून चालत आलेली असल्याचे दाखले आढळतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांनी त्यांच्या ओव्यांमध्ये ‘पोवाड’ असा शब्दप्रयोग केलेला आहे. इतकी पुरातन असलेली ही कला भविष्यात टिकेल की नाही हे सांगता येत नाही. १५९०मध्ये कऱ्हाडच्या कवी मनवथ शिवलिंग यांनी भवानी देवीवर पहिले काव्य लिहिल्याची नोंद आहे. भेदिक शाहिरीतून या परंपरेचा उगम झाला. भेदिक म्हणजे भक्तिरसप्रधान. बुद्धीचा भेद करणारी अशी शाहिरी. स्वराज्यासाठी ज्याचा उपयोग केला गेला ती दांगटी शाहिरी. आज सादर होणाऱ्या पोवाड्यांमध्ये याच शाहिरीचा उपयोग होतो. मध्यंतरीच्या काळात गोंधळी समाजाचे शाहिरी या कलेशी नाते जडले. गोंधळी समाजाने देवादिकांचे आख्यान सांगून स्वराज्यधर्म जागा ठेवला. देश पारतंत्र्यात होता. त्या काळातील परिस्थिती आणि गरज लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककलाकारांना एकत्र केले आणि मराठी समाज शोधून काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. मराठी मुलखातील मराठी माणसांनी सैन्यात यावे म्हणून त्या काळातील शाहिरांनी शिवधनुष्यच हाती घेतले. शिवकालीन ७ पोवाडे आज उपलब्ध आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यान शाहिरांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. अमर शेख, अण्णा भाऊ साठे, आत्माराम पाटील, किसनराव हिंगे, अनुसयाबाई शिंदे, बापूराव विभुते, अंबूताई बुधगावकर यांनी चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्यात मोलाची कामगिरी बजावली. देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि शाहिरी कलेला उतरती कळाच लागली.

पोवाड्याचे कार्यक्रम सध्या होत नाहीत. तरीही काही कलावंत ही कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. सरकारी योजना शाहिरीच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवून काही शाहीर उदरनिर्वाह करीत आहेत. ही कला जिवंत राहावी म्हणून लहान मुला-मुलींनाच शाहिरीचे विनामूल्य प्रशिक्षण देत आहोत.
- दादा पासलकर,
अध्यक्ष, महाराष्ट्र शाहीर परिषद

४मुद्राभिनय, सादरीकरणातून रसिकांना वेगळ्या विश्वात घेऊन जाणाऱ्या अनेक लोककला आहे. नाटकाचा ‘फॉर्म’ नसला तरी नाट्यकलेइतकेच त्याला महत्व आहे. प्रबोधन करताना लोकांपर्यंत साभिनय पोहोचणाऱ्या या कलांना पूर्वी महत्व होते. मात्र, गेल्या काही वर्षांत ते कमी झाले आहे. या लोककलाही नाट्याचा एक प्रकार. बेळगाव येथे होत असलेल्या नाट्य संमेलनानिमित्त काही लोकांचा घेतलेला आढावा.

४ शाहीर प्रभाकर, सगनभाऊ, अनंत फंदी, राम जोशी, परशुराम, होनाजी हे काही प्रसिद्ध शाहीर. भेदिक शाहिरीतील हैबती हे एक प्रसिद्ध नाव. स्वांतत्र्यपूर्व काळातील सिद्राम मुचाटे (धुळे), लहरी हैदर (कोल्हापूर), तसेच नानिवडेकर, नारगोळकर, जंगमस्वामी ही नावाजलेली मंडळी. शाहिरी कवने गाऊन ब्रिटिशांविरुद्ध चिथावणी दिली म्हणून काही शाहिरांनी तुरुंगवास भोगला असल्याच्या नोंदी आहेत.

Web Title: Shahiri was the only one to come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.