दिवसाला सात हजारांवरून थेट शंभरच्याच आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:15 IST2021-08-24T04:15:34+5:302021-08-24T04:15:34+5:30
नीलेश राऊत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोमवारचा (दि. २३) दिवस पुण्यासाठी मोठा ऐतिहासिक ठरला. सोमवारी ...

दिवसाला सात हजारांवरून थेट शंभरच्याच आत
नीलेश राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोमवारचा (दि. २३) दिवस पुण्यासाठी मोठा ऐतिहासिक ठरला. सोमवारी (दि. २३) दिवसभरात केवळ ९७ नवे कोरोनाबाधित आढळून आले. सुमारे पाच-सहा महिन्यांपूर्वी शहरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट उसळली. तेव्हापासून रोजच्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या ही सातत्याने शंभरच्या पुढे राहिली आहे. त्यातही ८ एप्रिल २०२१ या एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे तब्बल ७ हजार १० कोरोनाबाधित शहरात आढळून आले. त्या दिवशी शहरात २३ हजार ५९६ संशयितांच्या कोरोना चाचण्या झाल्या होत्या. तपासणीच्या तुलनेत २९.७० टक्के इतके बाधित आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारच्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या दोन आकडी झाल्याने ती दिलासादायक ठरली आहे.
सोमवारसारखी दुसऱ्या लाटेतली नीचांकी नोंद यापूर्वी २५ जानेवारीला झाली होती. त्या दिवशी शहरात केवळ ९८ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्या वाढतच राहिली. दरम्यान, कोरोनाबाधितांची सक्रिय रूग्णसंख्याही सोमवारी २ हजारांच्या आत आली असून ती १ हजार ९३६ इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या तपासणी केंद्रासह शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये सोमवारी ५ हजार ७७८ जणांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी १.६७ टक्के आहे. दिवसभरात १० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यातले पाच जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
कोरोनाचा पहिला रुग्ण ९ मार्च २०२० रोजी सापडला. तेव्हापासून शहरातील रूग्णसंख्या सातत्याने वाढत गेली. डिसेंबर, २०२० या महिन्यात कोरोनाची पहिली लाट पूर्ण आटोक्यात आली. पण जानेवारी २०२१ नंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आणि अवघ्या दीड-दोन महिन्यांतच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुण्यात हाहाकार माजवला होता.