सात कोटींच्या कामांना मंजुरी
By Admin | Updated: January 14, 2015 03:11 IST2015-01-14T03:11:52+5:302015-01-14T03:11:52+5:30
शिक्षण मंडळाने स्थायी समिती सदस्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ऐनवेळचा विषय म्हणून स्थायी समितीपुढे ठेवून मंजुरी घेतली

सात कोटींच्या कामांना मंजुरी
पिंपरी : शिक्षण मंडळाने स्थायी समिती सदस्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ऐनवेळचा विषय म्हणून स्थायी समितीपुढे ठेवून मंजुरी घेतली. शिक्षण मंडळाच्या कामकाजाच्या या कृतीबद्दल स्थायी समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. या सभेत विविध विकास कामांच्या ७ कोटी ४७ लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी शांताराम भालेकर होते.
राजीव गांधी पूल सांगवी ते मुकाई चौक- किवळे बीआरटी रस्त्याचे सुशोभीकरण व अन्य कामे करण्यासाठी १ कोटी ३३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रभाग क्रमांक २९ मध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी ९३ लाख ८१ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चास स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली.
प्रभाग क्रमांक ३७ महात्मा फुलेनगर येथील नाल्यावर सी डी वर्क करण्यासाठी ४८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रभाग क्रमांक ३३ गवळीनगर येथे रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी २८ लाख ६७ हजार रुपये खर्च येणार आहे. कासारवाडी मैलाशुद्धिकरण केंद्रांतर्गत ड प्रभागातील मुख्य गुरुत्वनलिका, पंपिंग स्टेशन यामध्ये सुधारणा घडवून आणल्या जाणार आहेत. त्यासाठी येणाऱ्या ३२ लाख ८६ हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली. थेरगाव गावठाण येथे जलनि:सारणविषयक कामे करण्यासाठी २९ लाख ९४ हजार रुपये खर्च येणार आहे. दिघी येथे जलनि:सारण नलिका टाकण्यासाठी २७ लाख ३८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. चऱ्होलीतील वाड्या-वस्त्यांवर रस्त्यांची कामे करण्यासाठी ६६ लाख २७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)