‘पीपीपी’च्या भरवशावर साडेसात हजार कोटींचे ‘इमले’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:19 IST2021-02-05T05:19:47+5:302021-02-05T05:19:47+5:30
पुणे : पालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना अवास्तव वाढ करीत हे अंदाजपत्रक फुगविण्यात आले आहे. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ...

‘पीपीपी’च्या भरवशावर साडेसात हजार कोटींचे ‘इमले’
पुणे : पालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना अवास्तव वाढ करीत हे अंदाजपत्रक फुगविण्यात आले आहे. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सन २०२१-२२ च्या आर्थिक वर्षासाठी तब्बल ७ हजार ६५० कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. या अंदाजपत्रकामध्ये शाश्वत उत्पन्नापेक्षा खासगी भागीदारीसह सामाजिक दायित्वामधून (सीएसआर-सीईआर) विकसनाच्या (पीपीपी) कामांवर अधिक भर देण्यात आला आहे. पालिकेच्या अॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्यासोबतच मिळकतकर आणि बांधकाम परवानगीमधून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळविण्याचा भरवसा आयुक्त कुमार यांनी या वेळी व्यक्त केला. आयुक्तांचे अंदाजपत्रक फुगविलेले असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.
याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, आरपीआयच्या गटनेत्या सुनीता वाडेकर, मनसेचे गटनेते वसंत मोरे, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, डॉ. कुणाल खेमनार, सुरेश जगताप, मुख्य लेखापरीक्षक उल्का कळसकर आदी उपस्थित होते.
गेल्या तीन चार वर्षांत उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढविण्यात अपयश आलेले आहे. त्यातच पालिकेचे अंदाजपत्रक तब्बल साडेसात हजारांच्या पुढे गेल्याने स्थायी समितीचेही अंदाजपत्रक वाढणार आहे. गेल्या वर्षी आयुक्तांनी ६ हजार २२९ कोटींचे अंदाजपत्रक मांडले होते. त्यामध्ये यंदा तब्बल १४२१ कोटींची वाढ करण्यात आली आहे. पालिकेला जानेवारीपर्यंत मिळालेल्या उत्पन्नाचा आकडा ३ हजार २५० कोटींच्या घरात आहे. पालिकेचे उत्पन्न मार्च अखेरीस साडेचार हजारापर्यंत जाईल, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. उत्पन्नात आणखी एक हजार कोटींची वाढ झाली तरी पालिकेला तीन हजार कोटींची तूट येण्याची शक्यता आहे.
====