येरवड्यातील वाहनांच्या तोडफोड प्रकरणी सात आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:18 IST2021-03-04T04:18:17+5:302021-03-04T04:18:17+5:30
या गंभीरप्रकरणी येरवडा पोलिसांनी वाहनांची तोडफोड करीत दहशत पसरवणे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल ...

येरवड्यातील वाहनांच्या तोडफोड प्रकरणी सात आरोपींना अटक
या गंभीरप्रकरणी येरवडा पोलिसांनी वाहनांची तोडफोड करीत दहशत पसरवणे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या घटनेत रविवार रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फुलेनगर येथील घरोंदा सोसायटीच्या गार्डनजवळ फिर्यादी विनीत भालेराव याला गगन गिल व त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी दुचाकीवरून येत शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच लाकडी दांडके व कोयत्याने वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केली. याचवेळी विनीत याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी करून आरोपी फरार झाले. याप्रकरणी पोलिसांनी गगन गिल, सौरभ शिळीमकर, यश साहोत्रा, जयेश परमार, ओंकार खटके, स्वप्निल उबाळे (सर्व जण रा. कात्रज), तसेच साकिब शेख (रा. लक्ष्मीनगर, येरवडा) या सात आरोपींसह एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. अटक सात आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
याच वेळी घडलेल्या दुसऱ्या घटनेत रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास चिक्या माने, अरबाज व त्याचे इतर तीन साथीदारांनी रवी सुनील चव्हाण (रा. जयजवान नगर, येरवडा) याला गुरुद्वारा समोर पकडून धक्काबुक्की करत कोयत्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला. मात्र, रवी याने तो वार चुकवला. त्यानंतर या सर्वांनी दगडफेक करून रवी याची रिक्षा व एक कार या दोन वाहनावर दगडफेक करून पसार झाले. या घटनेतील आरोपींचा शोध सुरू आहे. दाखल गुन्ह्याचा तपास येरवडा पोलीस करीत आहेत.