पुणे : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ गावातील ११ वर्षीय मुलगा (नाव बदललेले) छोट्या जखमेतून धनुर्वाताची बाधा झाली. लसीकरण न झाल्यामुळे आजार झपाट्याने बळावला आणि त्याला श्वसनास त्रास होऊ लागल्याने तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल ५७ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवून अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे तो पूर्णपणे बरा झाला.
ससून रुग्णालयात दाखल होताच मुलाला बालरोग अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. श्वसनास तीव्र त्रास होत असल्याने तब्बल ५७ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. या काळात मुलाला न्यूमोनिया, शरीरातील प्रथिने-कॅलरींची कमतरता, औषधांच्या बदलत्या मात्रांचा ताण, वारंवार होणारे स्पॅझम्स अशा अनेक गुंतागुंतींशी सामना करावा लागला. संसर्गाचा धोका कायम असल्याने परिचारिकांची सेवा आणि डॉक्टरांचे सतत निरीक्षण हीच त्याची ढाल ठरली. वडील नसल्याने आईनेच रुग्णालयात राहून मुलाची सतत काळजी घेतली. वैद्यकीय समाजसेवा विभागाने अन्न व सोयींची जबाबदारी उचलली. आईचे मानसिक बळ आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांनी या कठीण लढाईत निर्णायक भूमिका बजावली आहे.
बालरोग विभागप्रमुख प्रा. डॉ. आरती किनिकर, बालरोग अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. उदय राजपूत, डॉ. राहुल दावरे, डॉ. सुविधा सरदार, निवासी डॉक्टर तसेच सिस्टर परवीन व सिस्टर प्रतिभा महाजन यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू राहिले. अखेर दीर्घ लढाईनंतर मुलगा पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे.
धनुर्वाताचे लसीकरण न करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. धनुर्वात हा पूर्णपणे टाळता येणारा आजार असून, लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. - डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय.