सक्षम महिला मिळेना घराण्यांचा अडसर सरेना!
By Admin | Updated: November 13, 2016 04:28 IST2016-11-13T04:28:14+5:302016-11-13T04:28:14+5:30
महापालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीत चार सदस्यांच्या प्रभागात २ सक्षम महिला उमेदवार शोधताना सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांकडून राजकीय नातेसंबंधालाच

सक्षम महिला मिळेना घराण्यांचा अडसर सरेना!
पुणे : महापालिकेच्या येत्या सार्वत्रिक निवडणुकीत चार सदस्यांच्या प्रभागात २ सक्षम महिला उमेदवार शोधताना सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांकडून राजकीय नातेसंबंधालाच महत्त्व दिले जात असून, त्यात चांगल्या कार्यकर्ता असलेल्या महिलांची कुचंबणा होत आहे.
राज्य सरकारकडून चार सदस्यांचा एक प्रभाग, अशी रचना जाणीवपूर्वक करून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षालाही अनेक प्रभागांमध्ये महिला उमेदवार मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहेत. त्यातूनच त्यांनी अन्य पक्षातील महिला उमेदवारांना पक्षात प्रवेश करून देण्याचा धडाका लावला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच सेना, मनसे यांनाही एखाद्या प्रभागाचा अपवाद वगळता बऱ्याच प्रभागांमध्ये महिला उमेदवार शोधावा लागत आहे. त्यातही पुन्हा राजकीय सोयच पाहिली जात आहे. आधीच सक्षम महिला कमी व त्यात पुन्हा राजकीय नातेसंबंधानाच प्राधान्य दिले जात असल्याने राजकीय पक्षांच्या मोजक्याच चांगल्या, सक्षम परंतू राजकीय गॉड फादर नसलेल्या महिला कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
चार सदस्यांचा एक प्रभाग व त्यात २ महिला यामुळे आता १६४ सदस्यांच्या सभागृहात तब्बल ८२ महिला असतील. त्यांचा शोध घ्यायचा कसा, असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना पडला आहे. प्रत्येक ठिकाणी इच्छुक महिलांची संख्या बऱ्यापैकी आहे, मात्र त्यात हौशी कार्यकर्त्या महिलाच जास्त आहे. सक्षम महिला कार्यकर्त्या असतील, तर त्यांच्यावर राजकीय घराण्यातील महिला मात करीत आहेत. काहीही राजकीय काम नसले तरी त्यांना प्राधान्य दिले जाते. त्यांच्यासाठी पक्षात मोठ्या पदांवर कार्यरत असलेली त्यांच्या घरातील पुरुष मंडळी प्रयत्न करीत असतात. नेत्यांच्या मागे लागून घरातील महिलांना उमेदवारी मिळवतात. त्यामुळे त्या प्रभागातील चांगल्या, कार्यकर्त्या असलेल्या, काही वर्षे राजकीय, सामाजिक काम करणाऱ्या महिला मागे पडत आहेत.
महापालिकेच्या सध्याच्या सभागृहात राजकारणी घरातील, पण राजकारणाशी काहीही संबध नसलेल्या, प्रभागात महिला आरक्षण पडल्यामुळे उमेदवारी मिळून निवडून आलेल्या बऱ्याच महिला नगरसेवक आहेत. सभागृहात विशेष काही कामगिरी केली नाही तरीही या वेळी पुन्हा त्यांचाच विचार होणार, हे नक्की असल्याने त्या त्या प्रभागातील सक्षम महिला कार्यकर्त्या नाराज झाल्या आहेत.
फारच कमी महिला राजकीयदृष्ट्या सक्रिय
राजकीय घराण्यांमधील महिला निवडून येतात, त्यांच्यातील फारच थोड्या राजकीयदृष्ट्या सक्रिय राहतात. त्यांचे पालिकेतील कामही त्यांचे पती किंवा मुले, दीर पाहतात. पुढील वेळी महिला आरक्षण नसले, तर लगेचच त्या जागेवर त्यांच्या घरातील पुरुष उभे राहतात. महिला परत घरात ढकलली जाते. परत ती कधीही कोणत्या पक्षीय कार्यक्रमांत आंदोलनात वगैरे दिसत नाही. ते आमच्या पक्षातील नेते आहेत, त्यांची थेट नावे घेता येत नाहीत, असे सांगत महिला आरक्षण सुरू झाल्यापासूनची अशी अनेक उदाहरणे राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सक्षम महिला कार्यकर्त्यांकडून दिली जातात.
त्या त्या वेळी या राजकीय घराण्यातील महिलांमळे त्या त्या भागातील सक्षम महिलांवर अन्यायच झाला. यामुळेच महिला आरक्षण असूनही मोठ्या प्रमाणावर महिला राजकारणी तयार होत नाहीत, असे राजकीय पक्षात काम करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.