ज्येष्ठाची फसवणूक गुन्हा दाखल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:11 IST2020-12-08T04:11:02+5:302020-12-08T04:11:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: ʻसावलीʼ या गतिमंद मुलांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या संस्थापकाचा भूखंड बळकावल्याप्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश ...

ज्येष्ठाची फसवणूक गुन्हा दाखल होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: ʻसावलीʼ या गतिमंद मुलांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या संस्थापकाचा भूखंड बळकावल्याप्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी कोथरूड पोलिसांना दिले आहेत.
वसंत ठकार (वय,८४, रा. कोथरूड) हे या संस्थेचे संस्थापक आहेत. किशोर गांधी व किशोर आलाटी (दोघेही रा. कोथरूड) यांच्याविरुद्ध त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ठकार यांच्यावतीने ॲड. हेमंत झंजाड यांनी गांधी आणि आलाटी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यासाठी दावा दाखल केला होता. आयडियल कॉलनीतील, प्रभा हाउसिंग सोसायटीमध्ये १३ ए हा मोकळा भूखंड ठकार यांच्या मालकीचा आहे. संबंधित भूखंड हा गेल्या अनेक वर्षांपासून मोकळा आहे. आरोपींनी त्याचे गेट तोडून तेथील ठकार यांच्या नावाचा मोठा बोर्ड काढून भूखंडाचा ताबा मिळवला. ठकारांनी त्यास विरोध केला असता आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तेथून धक्काबुक्की करून हुसकून लावले, अशी तक्रार ठकार यांनी न्यायालयात दाखल केली होती.
ठकार एकटेच राहत आहेत. त्यांच्या मालकीचा भूखंडाबाबत आरोपींना पूर्णपणे माहिती होती. आरोपी हे लॅंड माफिया आहेत. त्यांनी ठकार यांना जीवे मारण्याचाही प्रयत्न केला आहे. आरोपींकडे भूखंडाबाबत मालकी हक्कासंदर्भात कोणतेही कागदपत्र नसताना फक्त दादागिरी व दमदाटी करून भूखंडाचा ताबा घेतला आहे, आहे, असा युक्तिवाद ॲड. झंजाड यांनी केला. ॲड. झंजाड यांनी सादर केलेले पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून दोन्हीही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. आहेत.