पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचा शोध सुरू
By Admin | Updated: December 16, 2014 04:19 IST2014-12-16T04:19:17+5:302014-12-16T04:19:17+5:30
महापालिकेच्या जिजामाता रुग्णालय प्रभाग क्रमांक ४३ अ ची पोटनिवडणूक १८ जानेवारी २०१५ ला होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचा शोध सुरू
पिंपरी : महापालिकेच्या जिजामाता रुग्णालय प्रभाग क्रमांक ४३ अ ची पोटनिवडणूक १८ जानेवारी २०१५ ला होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या प्रभागातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचा शोध घेण्याचे काम विविध राजकीय पक्षांनी सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने १७ ते २० डिसेंबर या कालावधित इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत.
जिजामाता प्रभागाची पोटनिवडणूक लढल्यास केवळ अडिच वर्षे नगरसेवक म्हणुन काम करण्याची संधी मिळणार आहे. थोडया अवधीकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठीही खर्च तेवढाच करावा लागणार असल्याने नगरसेवक होण्याची इच्छा असूनही पुढे येण्यास कोणी तयार होत नाही. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, परंतू लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपच्या बाजुने मतदारांनी कौल दिला आहे. ही स्थिती डोळ्यासमोर असताना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढणे अवघड जावू शकते. ही बाब लक्षात घेऊन दोन्ही काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांनी इच्छेला मुरड घातली आहे. आमदार गौतम चाबुकस्वार यांनी या भागाचे नगरसेवक म्हणुन काम केले आहे. रिक्त जागेवर बंधू सुनील चाबुकस्वार यांना संधी मिळावी, अशी त्यांची सुप्त इच्छा आहे. परंतू शिवसेनेच्या नेत्यांना त्यांच्या मर्जीतल्या व्यक्तीला संधी द्यायची आहे. भाजपला महापालिका पोटनिवडणुकीत या अनुकुल परिस्थितीचा फायदा उठवायचा आहे. परंतू या प्रभागात कोण उमेदवार द्यायचा यासाठी त्यांना चाचपणी करावी लागणार आहे. एकुणच राजकीय पक्षांना जिजामाता प्रभागासाठी उमेदवाराचा शोध घेण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)