शेतकऱ्यांच्या व्यथा पाहून गणेशभक्त भावुक
By Admin | Updated: September 29, 2015 01:53 IST2015-09-29T01:53:29+5:302015-09-29T01:53:29+5:30
डीजे अन् ढोल-ताशाच्या दणदणाटाने बधिर झालेले गणेशभक्तांचे कान मिरवणुकीत शेतकऱ्यांची व्यथा ऐकून सुन्न झाले. दुष्काळ आण सावकारी कर्जाने खचून गेलेल्या शेतकऱ्यांची

शेतकऱ्यांच्या व्यथा पाहून गणेशभक्त भावुक
पुणे : डीजे अन् ढोल-ताशाच्या दणदणाटाने बधिर झालेले गणेशभक्तांचे कान मिरवणुकीत शेतकऱ्यांची व्यथा ऐकून सुन्न झाले. दुष्काळ आण सावकारी कर्जाने खचून गेलेल्या शेतकऱ्यांची ही व्यथा शिवदर्शन मित्र मंडळाने जिवंत देखाव्याच्या माध्यमातून समोर आणली. टिळक रस्त्यावर हा एकमेव जिवंत देखावा ठरला.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत अनेक मंडळे जिवंत देखावे सादर करतात. मात्र, विसर्जन मिरवणुकीत बहुतेक मंडळे विद्युत रोषणाई किंवा कृत्रिम देखावेच करतात. शिवदर्शन मंडळाने मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा ज्वलंत विषय देखाव्याच्या माध्यमातून गणेशभक्तांसमोर मांडला. देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत होती. सिंहगड रस्त्यावरील एस. के. डान्स अॅकॅडमीच्या सुमारे १५ कलाकारांनी साकारलेल्या या देखाव्याने सर्वांनाच भावुक केले. ‘एक गरीब शेतकरी पत्नी व एका मुलीसोबत राहत असतो. पण, दुष्काळामुळे पीक वाया गेल्याने आर्थिक स्थिती बिकट झालेली. त्यातच डोक्यावर सावकाराचे कर्ज. त्यामुळे हा शेतकरी एकदमच खचून जातो,’ असे यामध्ये दाखविण्यात आले. शेतकऱ्याची ही व्यथा ‘देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी...’ या गाण्यावर नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आली. त्याला उपस्थितांनी टाळ््या वाजवत उत्स्फूर्त दाद दिली.
सावकार आपल्या कर्जाची वसुली करण्यासाठी शेतकऱ्याला बेदम मारहाण करतो. त्यामुळे त्याच्या मनात आत्महत्येचा विचार घोंगावू लागतो. अखेर तो शेतकरी गळफास घेऊन जीवन संपवितो. त्यानंतर त्याची पत्नी व मुलीची झालेली परवड पाहून सर्व उपस्थित सुन्न होऊन जातात. देखाव्यातील काही प्रसंग मन हेलावणारे होते. हे दृश्य पाहून काही महिलांचे डोळे भरून आले. शेवटी ‘हेच का आपल्या अन्नदात्याचे भाग्य?’ असा फलक दाखवून आणि शेतकऱ्यांची अवस्था सांगून या देखाव्याचा शेवट होतो. यातील सर्वच कलाकारांचा अभिनय वाखाणण्याजोगा होता. विशेषत: शेतकऱ्याची भूमिका केलेला तरुण सर्वांच्याच लक्षात राहिला. (प्रतिनिधी)