सुरक्षा रक्षक, ड्रेनेज सफाई निविदेत ‘फिक्सिंग’चा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:11 IST2021-05-19T04:11:38+5:302021-05-19T04:11:38+5:30
पुणे : पालिका आयुक्त आणि प्रशासन सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली काम करीत आहे. विशिष्ठ ठेकेदारांना डोळ्यांपुढे ठेवून कोट्यवधींच्या निविदा सत्ताधाऱ्यांचे ...

सुरक्षा रक्षक, ड्रेनेज सफाई निविदेत ‘फिक्सिंग’चा आरोप
पुणे : पालिका आयुक्त आणि प्रशासन सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली काम करीत आहे. विशिष्ठ ठेकेदारांना डोळ्यांपुढे ठेवून कोट्यवधींच्या निविदा सत्ताधाऱ्यांचे ‘लाड’ पुरविण्यासाठी काढण्यात येत आहेत. ही उधळपट्टी तात्काळ थांबवण्याची मागणी शहर काँग्रेसने पालिका आयुक्तांकडे केल्याची माहिती शहाराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली.
यावेळी कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल, नगरसेवक रविंद्र धंगेकर, अविनाश बागवे उपस्थित होते. बागवे म्हणाले की, सुरक्षा रक्षक नियुक्ती, उद्यानांची देखभाल दुरूस्ती, नदी व तलावांतील जलपर्णी काढणे अशा कामात वर्षानुवर्षे चालत आलेल्या निविदातील अटी-शर्ती बदलण्यात आल्या आहेत. ‘ब्लॅक लिस्टेड’ सल्लागारांना पीपीपी तत्वावरील रस्त्यांच्या कामांसाठी नियुक्त केले जात आहे.
“ड्रेनेज लाईनची साफसफाई सेक्शन कम जेटींग रिसायकलर मशिनच्या सहाय्याने करण्यासाठीची ३२ कोटी रुपयांची निविदा काढली असून हे काम सात वर्षासाठी देण्यात येणार आहे. यासाठी मशिनरी कोणती आणि किती असाव्यात याची अट ऐनवेळी घालण्यात आली. सात वर्षासाठी काम दिल्याने पालिकेचे नुकसान होणार आहे,” असा दावा आबा बागुल यांनी केला.