पुरंदर तालुक्यात मनसेची भाजपाबरोबर छुपी युती
By Admin | Updated: February 8, 2017 02:49 IST2017-02-08T02:49:23+5:302017-02-08T02:49:23+5:30
पुरंदर तालुक्यात सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेकडून केवळ दिवे गटातील जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागांवर

पुरंदर तालुक्यात मनसेची भाजपाबरोबर छुपी युती
जेजुरी : पुरंदर तालुक्यात सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनसेकडून केवळ दिवे गटातील जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीच्या दोन जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत, तर भाजपाने हा गट पूर्णपणे सोडून इतर तीनही जिल्हा परिषदेच्या गटात व सहा पंचायत समिती गणात आपले उमेदवार उभे केले आहेत. यावरून तालुक्यात भाजपा आणि मनसेची युती असल्याची चर्चा आहे. नेते युती कोणाशीच नसल्याचे सांगत असले तरीही कार्यकर्ते मात्र अशी युती असल्याचेच खासगीत सांगतात.
तालुक्यात मनसे व भाजपाची युती होणार, याबाबत ‘लोकमत’ने निवडणुकीपूर्वीच म्हटले होते. मात्र, मनसेचे युवानेते बाबा जाधवराव यांनी आमची कोणाशीही युती किंवा आघाडी नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मात्र ही युती स्पष्ट झाली आहे. तालुक्यात गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासूनच मनसे आणि भाजपाचे घरोब्याचे संबंध राहिलेले आहेत. त्या निवडणुकीत भाजपाने मनसेचे नेते बाबा जाधवराव यांच्या बारामती तालुक्यातील भगिनी संगीताराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या उमेदवारीमुळे जाधवराव यांनी मनसेकडून निवडणूक लढवली नव्हती. निंबाळकर यांना मनसेने मोठी ताकद दिली होती. त्यानंतर या मिनी विधानसभा निवडणुकीत भाजपाने मनसेच्या बालेकिल्ल्यात दिवे-गराडे गटात आपला एकही उमेदवार उभा केलेला नाही.
इतर तीनही गटांतून भाजपाचे उमेदवार आहेत. यासाठी मनसेची मोठी मदत झाल्याची चर्चा आहे. बेलसर-माळशिरस गटात शिवसेनेच्या कारभाराला कंटाळून काही महिन्यांपूर्वी भाजपात दाखल झालेले गणपत कड यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर याच गटातील माळशिरस गणातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महादेव शेंडकर यांच्या पत्नी मीना शेंडकर यांना उमेदवारी दिली आहे. बेलसर गटात मात्र भाजपाचेच कार्यकर्ते कैलास जगताप यांच्या पत्नी पल्लवी जगताप या उमेदवार आहेत.