माध्यमिकचे वर्ग भरले.. उपस्थितीत २० टक्क्यांपेक्षाही कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST2021-01-08T04:27:02+5:302021-01-08T04:27:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या माध्यमिक शाळांची घंटा आज वाजली. परंतु, पहिल्या दिवशीची उपस्थिती केवळ १५ ते २० ...

Secondary classes filled .. less than 20% attendance | माध्यमिकचे वर्ग भरले.. उपस्थितीत २० टक्क्यांपेक्षाही कमी

माध्यमिकचे वर्ग भरले.. उपस्थितीत २० टक्क्यांपेक्षाही कमी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिकेच्या माध्यमिक शाळांची घंटा आज वाजली. परंतु, पहिल्या दिवशीची उपस्थिती केवळ १५ ते २० टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिली होती. महापालिकेच्या ४४ शाळांपैकी सोमवारी २२ शाळांमधील माध्यमिकचे वर्ग सुरू झाले असले तरी, शिक्षकांची कोरोनाचा तपासणीची प्रक्रिया, विद्यार्थ्यांच्या शाळेतील जाण्या-येण्याची व्यवस्था यामुळे येत्या दोन-तीन दिवसात हे प्रमाण वाढण्याची आशा आहे़

पुणे महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम व अटींची पूर्तता करून ४ जानेवारीपासून शहरातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा महाविद्यालये सुरू करण्यास मान्यता दिली़ यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठविण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र आवश्यक केले होते़ त्यानुसार महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील ८ हजार ५०० विद्यार्थ्यांपैकी साधारणत: ३० टक्के विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांनी संमतीपत्र दिले होते़ मात्र, आज पहिल्या दिवशी १५ ते २० टक्केच विद्यार्थी शाळेत आल्याची नोंद घेतली आहे़

--

चौकट

शहरातील महापालिकेसह खाजगी शाळांमधील १२ हजार शिक्षक व साडेचार शिक्षकेतर कर्मचारी यांच्यापैकी बहुतांशी जणांच्या कोरोना चाचणी अद्याप बाकी असल्याने माध्यमिकचे वर्ग अनेक ठिकाणी सुरू होऊ शकलेले नाहीत़ त्यामुळे माध्यमिक शाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, कोरोना चाचणी प्रमाण वाढवावे असे पत्र महापालिकेने एनआयव्ही (राष्ट्रीय विषाणू संस्था) ला दिले आहे़ सध्या महापालिकेच्या १५ व खाजगी ३० प्रयोगशाळेमध्ये आरटीपीसीआर (स्वॅब) घेतले जात आहेत़ त्यामुळे येत्या तीन-चार दिवसात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी होऊन शहरातील सर्व माध्यमिक शाळा सुरू होतील, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले़

--

चौकट

महापालिकेच्यावतीने शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांच्या दिलेल्या तयारीच्या अहवालानुसार महापालिकेच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या टीमकडून शहरातील शाळांची तपासणी केल्यावर संबंधितांना शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे़ शहरात आज पहिल्या दिवशी महापालिकेसह खाजगी ४४ शाळा सुरू झाल्या आहे. उद्यापासून आणखी १२६ शाळांमधील माध्यमिकचे वर्ग सुरू होणार आहेत़

Web Title: Secondary classes filled .. less than 20% attendance