अभियांत्रिकीचे द्वितीय वर्षाचे वर्ग फुल
By Admin | Updated: September 25, 2015 00:51 IST2015-09-25T00:51:13+5:302015-09-25T00:51:13+5:30
बारावी आणि सीईटी परीक्षेतून सूट मिळवूनही अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे

अभियांत्रिकीचे द्वितीय वर्षाचे वर्ग फुल
पुणे : बारावी आणि सीईटी परीक्षेतून सूट मिळवूनही अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या वर्गातील विद्यार्थी संख्येच्या तुलनेत द्वितीय वर्षाच्या वर्गांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदवी मिळविण्यासाठी पुणे विभागाबाहेरील विद्यार्थी प्रवेशासाठी येत असल्याचेही दिसून येत आहे.
काही पालकांनी आपल्या मुलाने इंजिनिअरच व्हावे, असे निश्चित केलेले असते. त्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेले बहुतेक विद्यार्थी दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची पदवी मिळविल्यानंतर त्यांना थेट द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश मिळतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेचा अभ्यास करावा लागत नाही. शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये पुणे विभागात थेट द्वितीय वर्षातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ४३ हजार ९३२ जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी २२ हजार ६०७ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाच, शिवाय पुण्याबाहेरील तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांनी पुणे विभागातील विविध महाविद्यालयांत प्रवेश घेतला. पुणे विभागीय तंत्र शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसर लोणावळा येथील विद्या प्रसारणी सभेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षास ३० विद्यार्थ्यांनी, तर द्वितीय वर्षास १४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तळेगाव येथील डी.वाय. पाटील महाविद्यालयात प्रथम वर्षास ५५, तर द्वितीय वर्षात २७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. केवळ पुण्यातच नाही, तर कोल्हापूर, सोलापूर आदी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या काही महाविद्यालयांमध्ये हीच स्थिती आहे.