अकरावी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग उपलब्ध
By Admin | Updated: June 8, 2015 06:02 IST2015-06-08T05:45:59+5:302015-06-08T06:02:59+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सोमवारी दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना गुण समजणार आहेत.

अकरावी प्रवेश अर्जाचा दुसरा भाग उपलब्ध
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सोमवारी दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना गुण समजणार आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी असलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा दुसरा भाग सोमवारपासूनच भरता येईल. विद्यार्थ्यांनी मागील वर्षाचे कट आॅफ विचारात घेवून तसेच माहिती पुस्तिकेचे काळजीपूर्वक वाचन करून मगच कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरावेत, असे आवाहन पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी केले आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून रविवारपर्यंत २५हजारांहून विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरून पूर्ण केला आहे. पहिला भाग भरलेला नाही़, अशांना सोमवारी पहिला व दुसरा भाग भरता येणार आहे. यंदा पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील विद्यार्थ्यांना कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरण्याची संधी दिली आहे. जाधव म्हणाले, ‘‘प्रवेश अर्जाच्या दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरावयाचे आहेत. दहावीचे गुण आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांचा मागील वर्षाचा कट आॅफ विचारात घेऊन काळजीपूर्वक पसंती क्रम भरावेत. प्रत्येकाने किमान ५० महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरणे बंधनकारक आहेत.
प्रामुख्याने विज्ञान आणि वाणिज्य अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा असते. काही वर्षांपासून केवळ नामांकित महाविद्यालयांतील कला शाखेच्या सर्व जागांवर प्रवेश होत आहेत. इतर महाविद्यालयातील कला शाखेच्या जागा रिक्त राहतात. त्यामुळे योग्य शाखेची निवड करा.
अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश
सीबीएससी, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई आणि महाराष्ट्राबाहेरील बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.विद्यार्थी व पालकांना सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या केंद्रांना भेट देता येईल. मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज,नेस वाडिया कॉलेज आणि पिंपरी येथील जयहिंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या केंद्रांवर संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे दूरध्वनी क्रमांक माहिती पुस्तकात प्रसिध्द करण्यात आले आहेत. त्यामुळे इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या माहितीसाठी या केंद्र प्रमुखांशी संपर्क साधावा.
प्रवेश अर्जाचा पहिला टप्पा
आपल्या शाळेतून मार्गदर्शन केंद्रावरून माहिती पुस्तिका खरेदी करा.
नमुना अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा.
माहिती पुस्तिकेमध्ये लॉग इन आयटी आणि पासवर्ड दिलेले आहेत.
http://pune.fyjc.org.in या वेबसाईटवर जा.
पहिल्यांदा लॉन-इन करण्यसाठी लॉग-इन आयडी आणि पासर्वड वापरा.
पासवर्ड बदला आणि पुढच्या वेळेस लॉग इन करण्यासाठी लक्षात ठेवा.
सिक्यूरिटी प्रश्न निवडून तसेच त्याची योग्य उत्तरे लक्षात ठेवा.
सोक्युरिटी प्रश्न व पासवर्ड यांची प्रिंट आऊट घ्या.
संगणकावर दिलेल्या सूचना पाळून टप्प्याटप्य्याने आॅनलाईन अर्ज भरा.
कन्फर्म या बटनावर क्लिक करून आपला अर्ज निश्चित करा.
प्रवेश अर्जाचा दुसरा टप्पा
पसंतीक्रम निश्चित करताना शाळा/ कॉलेजचे गेल्या वर्षाचे कट आॅफ पहा .
आपणास मिळालेले गुण, शाखा, अनुदानित / विनाअनुदानित, शुल्क, माध्यम, शिकविले जाणारे विषय तपासा.
आपल्या निवासापासूनचे अंतर येण्याजाण्याची सोय विचारात घ्या.
प्रवेश घ्यावयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंती क्रम (कॉलेज कोड) निश्चित करा.
निश्चित केलेल्या पसंतीक्रमांचा प्राधान्य क्रम ठरवून घ्या.
ठरविलेल्या प्राधान्यक्रमानुसार कॉलेज कोड अर्जात भरा.
मित्रांनी भरलेले पसंतीक्रम भरू नयेत.
मिळालेल्या गुणांचा विचार करून पसंतीक्रम भरावेत.