पणदरे येथील जबरी चोरीचा शोध

By Admin | Updated: July 11, 2015 04:24 IST2015-07-11T04:24:40+5:302015-07-11T04:24:40+5:30

सहा महिन्यांपूर्वी पणदरे (ता. बारामती) परिसरातील मानाप्पावस्ती येथे झालेल्या जबरी चोरीचा शोध लावण्यात बारामतीच्या गुन्हेशोध पथकाला यश आले

The search for theft in Paradar | पणदरे येथील जबरी चोरीचा शोध

पणदरे येथील जबरी चोरीचा शोध

बारामती : सहा महिन्यांपूर्वी पणदरे (ता. बारामती) परिसरातील मानाप्पावस्ती येथे झालेल्या जबरी चोरीचा शोध लावण्यात बारामतीच्या गुन्हेशोध पथकाला यश आले आहे. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत रामराव ढोकमहाराज यांच्या रिव्हॉल्व्हरसह सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. ते हस्तगत करण्यात आले आहेत.
जानेवारी २०१४मध्ये श्री केशवराव सर्जेराव जगताप यांच्या निवासस्थानी त्यांच्या आईच्या स्मृतिदिनानिमित्त रामराव ढोकमहाराजांच्या रामायणावरील पारायण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ग्रामस्थांची मोठी गर्दी होत असे. ढोकमहाराजांची जगताप यांच्या जुन्या घरात निवासाची सोय करण्यात आली होती. त्य ाठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी अमोल बाळासाहेब भोसले (रा. मानाप्पावस्ती) यांना नेमले होते. दि. २७ जानेवारी २०१४ रोजी रात्री ११च्या सुमारास ४ चोरट्यांनी अमोल भोसले यांना चाकूचा धाक दाखवून हाताने मारहाण करून एका बंद खोलीत कोंडून ठेवले. चोरट्यांनी इतर खोल्यांची कुलपे उचकटून खोलीतील रामराव ढोकमहाराजांचे इंडियन आर्म फॅक्टरी कंपनीचे रिव्हॉल्व्हर व ६ राऊंड, सोन्याचे साडेचौदा तोळ्यांचे ब्रेसलेट व इतर दागिने, असा ६ लाख ३१ हजार ५५० रुपयांचा माल जबरीने चोरून नेला. तसेच, चोरट्यांनी चोरी करून पळून जाताना गाढवे यांची यामाहा क्रुक्स गाडी चोरून नेली होती. या प्रकाराबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथक बारामती व वडगाव निंबाळकर पोलिसांनी संयुक्तपणे केला. तपासादरम्यान, पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे योगेश ऊर्फ नागेश सदाशिव भोसले (वय १९, रा. करपडी, ता. कर्जत, जि. नगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच, त्याच्याकडे केलेल्या सखोल तपासात हा गुन्हा त्याने व त्याचे साथीदार रेज्या नारायण भोसले (वय ३८, रा. नीरावागज, ता. बारामती), अक्षय रेज्या भोसले (वय २०), बहिऱ्या पाकिस्तान भोसले (वय ३०, रा. सोनगाव, ता. बारामती), प्रवीण राजू शिंदे (रा. वडूज, ता. खटाव, जि. सातारा), अजय शरद भोसले (रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) यांनी ही जबरी चोरी केल्याचे स्पष्ट झाले.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वडगाव निंबाळकर सतीश हिंदुराव शिंदे व बारामती गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार शिवाजी निकम, अशोक पाटील, बाळासाहेब भोई, अनिल काळे, संदीप मोकाशी, रविराज कोकरे, संदीप कारंडे, प्रदीप काळे, ज्ञानदेव साळुंखे, सदाशिव बंडगर यांनी शोधमोहीम राबवली. तसेच, दरोड्याच्या गुन्ह्यातील रेज्या नारायण भोसले व इतर तिघांना पकडले आहे. या दरोड्यात गेलेले रिव्हॉल्व्हर, ६ राऊंड व सोन्याचे १७ तोळे वजनाचे दागिने, असा ४ लाख ६२ हजार १५०चा माल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. या तपासात निवृत्त सहायक फौजदार अनिल जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. (वार्ताहर)

Web Title: The search for theft in Paradar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.