नराधमाला पकडण्यासाठी देशभर शोध
By Admin | Updated: May 9, 2017 04:07 IST2017-05-09T04:07:54+5:302017-05-09T04:07:54+5:30
संगणक अभियंता नयना अभिजित पुजारी (वय २६) आपले काम संपवून घरी जाण्यासाठी रात्री खराडी बायपास येथे झेन्सॉर कंपनीजवळ उभ्या होत्या.

नराधमाला पकडण्यासाठी देशभर शोध
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संगणक अभियंता नयना अभिजित पुजारी (वय २६) आपले काम संपवून घरी जाण्यासाठी रात्री खराडी बायपास येथे झेन्सॉर कंपनीजवळ उभ्या होत्या. इंडिका कॅबचालक योगेश राऊत तेथून जात असताना पुजारी यांना सोडण्याच्या बहाण्याने आपल्या मालकीच्या मोटारीतून निर्जन भागातून घेऊन गेला. ३ मित्रांसह त्यांच्यावर ३ वेळा बलात्कार केला. पुणे शहरातील हडपसरसारख्या गजबजलेल्या भागातून ४ तास फिरविले. नयना पुजारी यांना गाडीत नग्नावस्थेत लपवून ठेवले. नंतर ओढणीने गळा आवळून खून करून ओळख पटू नये म्हणून दगडाने चेहरा ठेचला.
हा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा ८ आॅक्टोंबर २००९ रोजी दाखल झाला. भा.दं.वि.कलम ३०२, ३७६, २०१, ३६४, ३९४ प्रमाणे तो दाखल आहे. योगेश अशोक राऊत (वय २९), राजेश पांडुरंग चौधरी (वय २६, दोघेही राहणार गोळेगाव, आळंदी, ता. खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय २६, सोळू, खेड) विश्वास हिंदूराव कदम (वय २७, मरकळ, ता. खेड, मूळ गाव खटाव, सातारा) या आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १६आॅक्टोंबर २००९ रोजी अटक केली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. ससून रुग्णालयाच्या त्वचारोग विभागात दाखल असताना मुख्य आरोपी योगेश राऊत नैसर्गिक विधीच्या बहाण्याने पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. १७ सप्टेंबर २०११ रोजी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार झाला. त्याबाबत त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर ३१२/२०११ कलम २२४, २२५(अ)४६८,४७१, १२०(ब)२१६ नुसार गुन्हा दाखल झाला. या प्रकारामुळे जनतेमध्ये संतापाची लाट पसरली. पोलिसांची नाचक्की झाली. राऊत याला पकडण्यासाठी आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला.
राऊत यास पकडण्याची जबाबदारी गृहखात्याने विशेष तपास पथकावर सोपविली. तत्कालीन पोलीस आयुक्तांनी फरारी गुन्हेगारांना पकडण्यात वाकबगार असलेले पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांची या पथकामध्ये नेमणूक केली. गोवेकर यांनी राऊत यास ओळखणाऱ्या देवीदास भंडारे, संंतोष जगताप, प्रदीप सुर्वे या कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले. या पथकाने राऊत याच्या गावातील मित्र, नातलग, विरोधक, बालपणीचे मित्र, आजवर केलेल्या नोकऱ्यांमधील सहकारी यांच्याशी संपर्क वाढवून राऊत याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.
तपास पथकाची नजर राऊत याचा लहान भाऊ मनोज, आई सुनीता आणि पत्नी श्रावणी योगेश राऊत यांच्यावर होती. राऊत कुटुंबीयांचे बेफिकीर वागणे पथकातील जाणकारांना खटकत होते. राऊत याची आस्तिक स्वभावाची आई, पत्नी, सासू, मेव्हणा देवदेवस्की करत असताना त्यांच्या संपर्कात येणाऱ्या पोतराज अशोक शेडगे (यवत, दौंड) याला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य सांगून त्याच्या आईकडून काही माहिती मिळविली. तसेच येरवडा कारागृहात राऊत ज्यांच्या संपर्कात होता, त्या गुन्हेगारांकडूनही काही माहिती मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गुजरातमधील वापी, बडोदा, पोरबंदर, सोमनाथ, द्वारका, अहमदाबाद, राजस्थानमधील अजमेर, चितोडगड, जयपूर अशा ठिकाणी विशेष तपास पथकाने राऊत याचा अथक शोध घेतला. तो सुरतमधील बादलसिंग (मूळ बिहार) यास पळून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भेटल्याची माहिती पोलिसांना समजली.
यादरम्यान दिल्लीतही गँगरेपमुळे देशभर असंतोष पसरला. नयना पुजारी हिचे पती अभिजित पुजारी यांनी काही संघटनांसोबत पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला. प्रसारमाध्यमांनीही हे प्रकरण झोतात ठेवून विशेष तपास पथकाबाबत नाराजी व्यक्त केली. अशा वेळी सतीश गोवेकर यांना राऊत पंजाब, दिल्ली येथे असल्याची माहिती समजली. या माहितीचा पाठपुरावा करण्यासाठी तपास पथक मे महिन्यात दिल्लीमध्ये दाखल झाले.
१५ दिवसांमध्ये २० ते २५ जणांकडे चौकशी करूनही राऊत याच्या वास्तव्याचा पत्ता मिळत नव्हता. चिकाटीने तपास पथक काम करत असताना राऊत हा दिल्लीहून शिर्डीला रवाना झाल्याची माहिती समजली. या तपास पथकाने तात्काळ शिर्डी गाठली. ज्या ठिकाणी राऊत येणार होता़ तेथे सापळा रचला. शिर्डी बस ठाण्यात राऊत आलेला दिसल्यावर पथकातील संतोष जगताप यांनी त्यास ओळखले. त्याला हाक मारताच तो बावचळला त्याबरोबरच पोलिसांनी राऊत याच्यावर झडप टाकून त्याला पकडले़
सरकार पक्षाकडून भक्कम पुरावा-
नयना पुजारी खून खटल्यात परिस्थितीजन्य पुरावा असून गुन्हा करण्याचा आरोपींचा उद्देश, हेतू सिद्ध होत आहे. माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याने नयना पुजारी आणि आरोपींना शेवटचे पाहिले होते. या खटल्यात वैद्यकीय पुरावा भक्कम आहे. खटल्यातील दोन आरोपींनी त्यांच्या मित्रांकडे गुन्हा केल्याची कबुली दिली होती. पुजारी यांचे दागिने, घड्याळ आरोपींकडून जप्त करण्यात आले. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या कपड्यावर नयना पुजारी यांच्या रक्तगटाचे रक्त आढळले. आरोपींच्या कपड्यावर हे रक्त कसे याचे स्पष्टीकरण बचाव पक्षाला देता आले नाही. या खटल्यातील माफीच्या साक्षीदाराने दिलेली साक्ष आणि सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य पुरावे एकमेकांना पूरक आहेत, असे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी सांगितले.
सहा कलमांखाली आरोपी दोषी :
हर्षद निंबाळकर
संगणक अभियंता नयना पुजारी खून खटल्यात न्यायालयाने तीनही आरोपींना अपहरण, बलात्कार, चोरी, खून, कट रचणे तसेच पुरावा नष्ट करणे या कलमांखाली दोषी ठरविले आहे. शिक्षेच्या सुनावणीसाठी न्यायालयाने एक दिवसाची मुदत दिली असून आरोपींना फाशी की जन्मठेप याबाबत दोन्ही पक्षांचा युक्तिवाद उद्या होणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी दिली.
निंबाळकर म्हणाले, की आरोपींकडून ज्या पद्धतीने हा गुन्हा करण्यात आला, त्याचे स्वरूप पाहता दिल्लीतील निर्भया प्रकरणाची घटना डोळ्यांसमोर उभी राहते. नयना पुजारी खून खटल्यादरम्यान सहा साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. यादरम्यान, मुख्य आरोपी योगेश राऊत यास ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरारी झाला. दीड ते पावणेदोन वर्षे पोलीस योगेश राऊतचा शोध घेत होते. राऊत फरारी असल्याने खटला लांबला. त्यानंतर खटला पूर्ववत सुरू झाला. यामध्ये सरकार पक्षाने एकूण ३७ साक्षीदार तपासले. नयना पुजारी अपहरण, बलात्कार व खून प्रकरण ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे. गुन्ह्यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी न्यायालयाकडे करणार असल्याचेही निंबाळकर यांनी सांगितले.
न्यायालयातील गर्दी
सबंध पुणे जिल्ह्यात खळबळ माजविणाऱ्या नयना पुजारी खून खटल्याचा निकाल जाहीर होणार असल्याने न्यायालयात नवोदित आणि अभ्यासू वकील, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, पोलीस अधिकारी यांची गर्दी झाली होती. त्यांच्यात कुजबूज स्वरूपात बोलणे सुरू होते. आरोपींना पिंजऱ्यामध्ये उभे केल्यानंतर न्यायालयाने त्यांना आपले बोलणे ऐकू येते का? अशी पृच्छा केली. नंतर न्यायासनासमोर बोलावून त्यांच्यावरील आरोपाचा सारांश सांगितला. त्या वेळी निकाल ऐकण्यासाठी सर्वच जण उभे राहिले. काही मिनिटे संपूर्ण शांतता पसरली. सबंध वेळ आरोपी मान खाली घालून होते.
ससून रुग्णालयात असताना योगेश राऊत याला पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता़ त्या गुन्ह्याचा स्वतंत्र खटला चालविण्यात आला़ या खटल्याचा निकाल लागला असून त्यात त्याला प्रथमवर्ग न्यायालयाने ६ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे़
आरोपींना कमीत कमी शिक्षा व्हावी
नयना पुजारी खून खटल्यात न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविले असले तरी त्यांना कमीत कमी शिक्षा व्हावी. दिल्ली येथील निर्भया प्रकरण व नयना पुजारी खून प्रकरण या दोन्ही घटनांमध्ये काहीही साम्य नाही. ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाची नाही. परिणामी, आरोपींना शिक्षा सुनावताना भावनावश होऊन निर्णय दिला जाऊ नये ही अपेक्षा आहे. माफीच्या साक्षीदाराची निर्दोष मुक्तता समाजापर्यंत चुकीचा संदेश नेणारी आहे. कारण तोही या गुन्ह्यात सहभागी होता. येथून माफीचा साक्षीदार म्हणून अनेक आरोपी त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.
- बी. ए. आलूर, बचाव पक्षाचे वकील
चौधरी माफीचा साक्षीदार
राजेश चौधरीने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविल्यानंतर त्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकांऱ्यापुढे जबाब नोंदविण्यात आला होता. मात्र, राऊत पसार झाल्यानंतर चौधरी याने माफीचा साक्षीदार होण्यास नकार दिला. त्यामुळे चौधरी याच्या माफीचा साक्षीदार होण्याबाबत बचाव पक्षातर्फे उच्च न्यायालयात हरकत घेण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चौधरी माफीचा साक्षीदार होण्यावर शिक्कामोर्तब झाले, अशी माहिती निंबाळकर यांनी दिली.
पोलिसांचे परिश्रम
नयना पुजारी खून खटल्यात येरवडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक दीपक सावंत यांनी मोलाची कामगिरी केली. आवश्यक कागदपत्रे तयार करण्यासाठी हवालदार प्रकाश लंघे, सुनील कुलकर्णी, सचिन कदम यांनी साहाय्य केले. पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतरही दीपक सावंत महत्त्वाच्या सुनावणीसाठी हजर राहत. सरकार पक्षाकडून त्यांनी साक्ष दिली. सावंत आज प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले, ‘आरोपींना फाशीची शिक्षा होणे योग्य होईल. अशाच प्रकारचा अन्य एक गुन्हा त्यांनी केल्याचे उघड झाले होते. चंदननगरमधील भाजीविक्रेत्या महिलेचे अपहरण करून त्यांनी बलात्कार व खून केला. विश्रांतवाडी भागातूनही एका महिलेचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी सरावले असल्याचे तपासात दिसून आले होते.
तब्बल पावणे आठ वर्षे रेंगाळला खून खटला -
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खटला सुरू असताना मुख्य आरोपीने केलेले पलायन, त्यामुळे पावणेदोन वर्षे सुनावणी थांबणे, न्यायाधीशांची झालेली बदली, तांत्रिक मुद्द्यावरून आरोपींच्या वकिलांनी उच्च न्यायालयात घेतलेली धाव, लांबलेला युक्तिवाद तसेच न्यायालयाकडील असलेली असंख्य प्रकरणे अशा अनेक कारणांमुळे गुन्हा घडल्यानंतर तब्बल ८ वर्षांनंतर नयना पुजारी खून खटल्याचा निकाल येत आहे़
नयना पुजारी हिचा ९ आॅक्टोबर २००९ रोजी अपहरण करून खून करण्यात आला होता़ त्यानंतर यातील आरोपींना १६ आॅक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती़ तपासानंतर त्यातील एक आरोपी राजेश चौधरी याला माफीचा साक्षीदार करण्यात आले़ त्याला माफीचा साक्षीदार करू नये, म्हणून इतर आरोपीच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली़ तेथे हा अर्ज जवळपास ४ महिने प्रलंबित राहिल्याने खटल्याचे कामकाज पुढे सरकू शकले नाही़ उच्च न्यायालयाने आरोपींचा अर्ज फेटाळल्यानंतर पुन्हा खटल्याचे कामकाज सुरु झाले़ पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़ हे दोषारोप योग्य पद्धतीने ठेवले गेले नसल्याचे कारण पुढे करुन पुन्हा आरोपीचे वकील उच्च न्यायालयात गेले होते़ तोही अर्ज फेटाळला गेल्यानंतर खटल्याचे कामकाज रीतसर सुरु झाले़ न्यायालयात ६ साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाली़ त्याच दरम्यान मुख्य आरोपी योगेश राऊत हा आजारी असल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले़ तेथे असताना १७ सप्टेंबर २०११ रोजी लघुशंकेचा बहाणा करून तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला़ त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी अगदी राजस्थानपासून दिल्लीपर्यंत मोहीम राबविली़ योगेश राऊत सापडत नसल्याने पोलिसांवर टीकेची झोड उठली़ त्याच वेळी न्यायालयीन कामकाज थंडावले़ त्यानंतर तब्बल पावणेदोन वर्षांनंतर योगेश राऊतला ३० मे २०१३ मध्ये पकडण्यात आले़
त्यानंतर पुन्हा रीतसर खटला सुरु करण्यात आला़ या खटल्यादरम्यानच पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याचा खटलाही प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरु होता़ त्यात मे २०१७ मध्ये योगेश राऊतला ६ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली़
नयना पुजारी खून खटल्याचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर या खटल्याची सुनावणी इनकॅमेरा घेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला़ त्याविरुद्ध आरोपींचे वकील उच्च न्यायालयात गेले़ तेथे त्या अर्जावर सुनावणी होईपर्यंत पुन्हा खटल्याचे कामकाज लांबले़ उच्च न्यायालयाने हाही अर्ज फेटाळल्यानंतर खटल्याचे कामकाज रीतसर सुरु झाले़ या खटल्यात विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी एकूण ३७ साक्षीदार तपासले़ बचाव पक्षाकडून या साक्षीदारांची उलटतपासणी दीर्घकाळ सुरु होती़ याच दरम्यान वेळोवेळी या खटल्याचे कामकाज सुरु असलेल्या ५ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या़ त्यामुळे आतापर्यंत खटल्याचे कामकाज कुठवर आले आहे, हे नवीन न्यायाधीशांना समजावून घ्यावे लागत असल्याने त्यात सुनावणी लांबणीवर पडत गेली़
सरकार पक्षाच्या साक्षीदारांची साक्ष संपल्यानंतर बचाव पक्षाने १२ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली़ हा साक्षीपुरावा या वर्षी जानेवारीमध्ये संपला़ त्यानंतर सरकार पक्षातर्फे अॅड़ हर्षद निंबाळकर यांनी २ फेब्रुवारी २०१७ ला आपला अंतिम युक्तिवाद सुरु केला़ तो २ मार्चला पूर्ण झाला़ त्यानंतर बचाव पक्षाचे वकील अॅड़ ए़ बी़ अलुर यांचा युक्तिवाद १५ एप्रिलपर्यंत सुरु होता़ त्यानंतर पुन्हा सरकार पक्षाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने एप्रिलअखेर खटल्याच्या निकालाची तारीख जाहीर केली़ सोमवारी ८ मे रोजी आरोपींना दोषी ठरविण्यात आले़
रसिला राजू खून प्रकरण; आरोपीवर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
४आपल्याकडे सारखे बघत असल्याच्या कारणावरून आणि वरिष्ठांकडे तक्रार करु नये यासाठी हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीमधील सुरक्षारक्षकाने कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करणाऱ्या रसिला राजू या तरुणीचा गळा आवळून खून केला होता. हिंजवडी पोलिसांनी त्याला मुंबई येथून अटक केली होती.
४पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. बाबेन सैकियी, असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव. त्याने रसिलाचा वायरने गळा आवळून खून केला होता. रसिला ही मूळची केरळची होती. रात्री कंपनीच्या आवारात रसिलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. तपासणीदरम्यान रसिलाचा वायरने
गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी सुरक्षारक्षक बाबेनला अटक केली होती. घटनेनंतर बाबेन मुंबईला पळून गेला होता. त्याला मुंबईतून अटक केली होती.