गोदामे खुशाल सील करा!

By Admin | Updated: January 14, 2015 23:59 IST2015-01-14T23:59:34+5:302015-01-14T23:59:34+5:30

राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर कारखान्यांची गोदामे सील करणार, अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे राज्यातील कारखानदार धास्तावले आहेत.

Seal the warehouse! | गोदामे खुशाल सील करा!

गोदामे खुशाल सील करा!

सोमेश्वरनगर : राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर कारखान्यांची गोदामे सील करणार, अशी भूमिका घेतली आहे. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे राज्यातील कारखानदार धास्तावले आहेत.
सहकारमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक कारखानदारांनी नाराजी व्यक्त करीत गोदामे सील करणार असाल, तर खुशाल करा; पण सहकारमंत्री महोदय, तुम्हीच ती साखर ३२०० रुपयांनी विकत घ्यावी. आम्ही सरकारच्या मदतीशिवाय शेतकऱ्यांना एफआरपी देऊ, अशी मागणी अनेक कारखानदारांनी व्यक्त केली आहे. तर, तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी टनाला जाहीर केलेले ४ हजार रुपये तूर्तास तरी एफआरपी देण्यासाठी उपयोग होऊ शकत नसल्याचे मत कारखानदारांनी व्यक्त केले.
राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन सत्तर दिवस झाले. तरीही साखर कारखानदारांनी ऊसउत्पादकांना एफआरपी अदा केलेली नाही. या पार्श्वभूमीवर काल शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, सतीश काकडे, पृथ्वीराज जाचक यांच्यासह शेकडो शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यामुळे गेल्या सत्तर दिवसांपासून शांत आलेला ऊस काल पेटला. वास्तविक कारखाने सुरू झाल्यापासून १४ दिवसांच्या आत पहिला हप्ता देणे बंधनकारक असताना कारखान्यांनी शेतकऱ्यांना अजूनही उसाची रककम अदा केलेली नाही.
दुसरीकडे मात्र कारखाने सुरू होऊन तीन वेळा साखरेचे दर कोसळल्याने राज्य बँकेने पोत्यावरील उचलीत तीन वेळा घट करीत शेतकऱ्यांना देण्यासाठी कारखानदारांच्या हातात अवघे १३१५ रुपये ठेवले आहेत. मग एफआरपी देणार कशी? एक तर शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने कारखान्यांना अनुदान द्यावे, नाहीतर सरकारनेचे ३२०० रुपयांनी साखर विकत घ्यावी. त्याचे रोख पैसे द्यावेत. आम्ही शेतकऱ्यांना लगेचच एकरकमी एफआरपी अदा करू, अशी भूमिका घेत सहकारमंत्र्यांच्या वकतव्यावर नाराजी व्यक्त केली आहे, तर केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री यांनी निर्यात होणाऱ्या कच्चा साखरेला प्रतिक्विंटल ४०० रुपये अनुदान जाहीर केले आहे. ही बाब स्वागतार्ह आहे. (वार्ताहर)

Web Title: Seal the warehouse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.