मुरूमचोरांचा उद्योजकाच्या भूखंडावर डल्ला
By Admin | Updated: June 18, 2015 22:38 IST2015-06-18T22:38:13+5:302015-06-18T22:38:13+5:30
लहानमोठे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी व्यावसायिकांनी एमआयडीसीकडून खरेदी केलेल्या भूखंडांमधून मोठ्या प्रमाणात मुरूम आणि माती यांची चोरी होत आहे.

मुरूमचोरांचा उद्योजकाच्या भूखंडावर डल्ला
आंबेठाण : लहानमोठे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी व्यावसायिकांनी एमआयडीसीकडून खरेदी केलेल्या भूखंडांमधून मोठ्या प्रमाणात मुरूम आणि माती यांची चोरी होत आहे. याबाबत पोलीस आणि एमआयडीसी यांना कळवूनही या मुरूमचोरांवर कारवाई होत नसल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. ही चोरी करताना अन्य मालमत्तेचेदेखील नुकसान केले जाते.
चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये सध्या भूखंडांचे वाटप आणि त्या भूखंडांचे विकसन करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी भूखंड घेतलेले अनेक व्यावसायिक परगावी राहतात. या परिसरासह आजूबाजूच्या भागातदेखील औद्योगिकीकरण होत आहे, तसेच बांधकाम व्यवसायदेखील तेजीत आहे. या ठिकाणी भरावासाठी मुरूम आवश्यक आहे. त्यासाठी असे भूखंड शोधले जातात आणि रात्री त्या ठिकाणी डल्ला मारून रातोरात त्याची चोरी करून तो अन्य ठिकाणी हलविला जातो आणि त्यामधून लाखो रुपये कमावले जात आहेत. त्याचप्रमाणे मातीचीदेखील चोरी केली जात आहे.
याबाबत अनेक उद्योजकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे; परंतु पोलीसदेखील मूग गिळून गप्प आहेत.
या चोरीबाबत महसूल विभाग तर चुप्पी साधून आहे. माहिती असूनही ते या मुरूमचोरांवर कारवाई करण्यास धजावत नाहीत. त्यांच्या या कारवाई न करण्यामागचे कारण मात्र गुलदस्तात आहे. अशा होणाऱ्या चोऱ्यांमुळे या भागात येणारे उद्योजक मात्र त्रस्त झाले आहेत. या परिसरात अनेक ठिकाणी स्वमालकीच्या भूखंडातून, तर काही ठिकाणी एमआयडीसीच्या मालकीच्या जागेतून ही चोरी केली जात आहे. या चोऱ्या बहुतांश रात्रीच्या वेळी केल्या जात आहेत. त्यामुळे या भागात रात्रीच्या वेळी गस्त सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
याबाबत एमआयडीसीचे चिंचवड येथील कायर्कारी अभियंता पांगारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की या मुरूमचोरीबाबत तहसीलदारांना माहिती दिली आहे आणि पुन्हा अशा चोऱ्या होत असतील, तर नव्याने पुन्हा माहिती महसूलला देऊ. तसेच, वीजवितरण कंपनीलादेखील याबाबत माहिती दिली जाईल. (वार्ताहर)
चोरी करताना वीजवितरण कंपनीचे खांबदेखील सोडले जात नाहीत. या खांबांना अगदी खेटून मुरूम आणि माती उकरली जात आहे. त्यामुळे हे खांब निराधार झाले असून, ते वाऱ्याने किंवा पावसाच्या माऱ्याने सहज कोसळतील, अशी स्थिती आहे. या वीजवाहिन्या ३३ के.व्ही.च्या आहेत. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही चोरी करताना उद्योजकांच्या अन्य मालमत्तेचे नुकसान केले जाते. यात भूखंडाला केलेले दगडी किंवा तारेचे कंपाऊंड पाडले जाते आणि नुकसान
केले जाते.