पुरस्कार निवडीसाठी शास्त्रशुद्ध पद्धत
By Admin | Updated: March 15, 2015 00:33 IST2015-03-15T00:33:18+5:302015-03-15T00:33:18+5:30
क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कारासाठी पुरस्कारार्थींची निवड मंत्र्यांनी करणे योग्य नाही तर पुरस्कारार्थींची निवड क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींच्या समितीने करावी.

पुरस्कार निवडीसाठी शास्त्रशुद्ध पद्धत
पुणे : क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कारासाठी पुरस्कारार्थींची निवड मंत्र्यांनी करणे योग्य नाही तर पुरस्कारार्थींची निवड क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींच्या समितीने करावी. या निवडीसाठी राज्य सरकार लवकरच शास्त्रशुद्ध पद्धत निर्माण करणार आहे. तसेच बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी वार्षिक १२ कोटी रूपयांची तरतूद करण्यात येईल व या द्वारे अनेक क्रीडा स्पर्धा घेण्यात येऊ शकेल, असे वक्तव्य शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केले.
सिंबायोसिस स्पोर्टस सेंटरतर्फे क्रीडाभूषण पुरस्कारवितरणाचे आयोजन करण्यात आले होते. तावडे यांच्या हस्ते लक्ष्य फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल चोरडिया यांना ‘क्रीडाभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्येष्ठ अस्थिशल्यविशारद डॉ. के. एच. संचेती, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, उपाध्यक्ष डॉ. अरविंद संगमनेरकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, स्पोर्टस् सेंटरचे मानद संचालक सतीश ठिगळे आदी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, ‘शिवछत्रपती पुरस्कारार्थींची निवड क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींची समितीने करावी. खेळाडूचे योगदान, विविध स्पर्धांमधील कामगिरी यावरून गुण देऊन त्या आधारे पुरस्कारार्थींची निवड करावी. यासाठी शास्त्रशुद्ध पद्धत निर्माण करण्यात येईल.
बालेवाडी क्रीडा संकुलासाठी दरवर्षी तब्बल १२ कोटी रुपये देखभाल खर्च लागतो. हा खर्च उभा करण्यासाठी तेथे लग्नसोहळ्यांसह काही कार्यक्रम घेण्यात येतात. परंतु, आता अर्थसंकल्पातच दरवर्षी या संकुलाच्या देखभालीसाठी १२ कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. ज्याचा उपयोग क्रीडा स्पर्धांसाठीच होईल.
चोरडिया म्हणाले, ‘मी स्वत: राष्ट्रीय स्तरावर टेनिस चॅम्पियन होतो. परंतु, आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकलो नाही. त्यामुळेच सुप्तावस्थेतील गुणवंत खेळाडू हेरून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्यासाठी पूर्ण मदत करण्याच्या हेतूने लक्ष्य फाउंडेशनच्यामार्फत काम करत आहे.’
तावडे यांनी साधला उपस्थितांशी संवाद
४विविध खात्यांचा मंत्री असल्याने दिवसभरात अनेक कार्यक्रम भाषणे करावी लागतात. परंतु, कार्यक्रमांमुळे इच्छा असूनही थेट संवाद साधता येत नाही, अशी खंत विनोद तावडे यांनी व्यक्त केली. छोटेखानी भाषणानंतर स्टेजवरून खाली येत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत काही प्रश्नांची उत्तरे दिली.