Science-based literature will get a boost | विज्ञानाधारित साहित्याला चालना मिळेल

विज्ञानाधारित साहित्याला चालना मिळेल

मान्यवरांचा सूर : डॉ. नारळीकर यांची निवड यापूर्वीच व्हायला हवी होती

पुणे : साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड म्हणजे संमेलनाच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. डॉ. नारळीकरांनी विज्ञान आणि साहित्याची उत्तम सांगड घातली आहे. ते प्रज्ञावंतही आहेत आणि प्रतिभावंतही. त्यांची निवड सर्वार्थाने योग्य आहे. त्यांच्या निवडीने विज्ञानाधारित साहित्याला चालना मिळेल, अशी भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली.

नाशिक येथे होत असलेल्या आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि वैैज्ञानिक लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची सन्मानाने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांची निवड यापूर्वीच व्हायला हवी होती, असेही मत व्यक्त होत आहे.

उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो म्हणाले, ‘डॉ. नारळीकर हे महायोगी आणि ॠषीतुल्य आहेत. त्यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. शासनानेही त्यांचा सन्मान केला आहे. मराठी साहित्यात त्यांचे मोठे योगदान आहे. विज्ञानकथा हा साहित्यप्रकार त्यांनी लोकप्रिय केला. त्यांची निवड ही संमेलनाचा सन्मान आहे.’

राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर म्हणाले, ‘डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारख्या एका व्रती, बुध्दिमान आणि सदशील वैैज्ञानिकाची मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली, याचा मला मनापासून आनंद झाला. डॉ. नारळीकरांपूर्वीही मराठीत विज्ञान लेखन होत होते. पण तो प्र्रवाह काहीसा क्षीण होता. डॉ. नारळीकर लिहिते झाले, त्यावेळी त्यांच्या नावामागे आंतरराष्ट्रीय किर्तीच्या वैैज्ञानिकाचे मोठे वलय होते. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी पदमविभूषण या किताबाचे ते मानकरी होते. त्यांनी विज्ञान कथा, कादंबरीचे लेखन एका उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक नवे लेखक विज्ञान विषयाकडे वळले. या सगळयांनी विज्ञान लेखनाचा प्रवाह जोमदार करुन तो मुख्य साहित्य प्रवाहात मिसळून गेला. हे श्रेय अर्थात डॉक्टरांचे आहे.’

---------------------

जयंतरावांचे आणि माझे घरोब्याचे संबंध आहेत. त्यांना आणि मंगलाला झाला असेल, तेवढाच आनंद मलाही झाला आहे. ते थोर शास्त्रज्ञ आहेतच; त्यांनी सहजसोप्या भाषेत वैैज्ञानिक लिखाण केले आहे. संमेलनाध्यक्षपद हा खूप मोठा सन्मान आहे. परमेश्वर एखाद्याला अनेक गुण देतो. तसेच जयंतराव आहेत. त्यांची निवड यापूर्वीच व्हायला हवी होती. त्यांनी लिखाणातून जनजागृतीही केलेली आहे. मनोरंजन आणि ज्ञानाची उत्तम सांगड त्यांनी घातली आहे.

- डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

------------------

संमेलनाध्यक्षपदी वैज्ञानिकाची निवड हा खूप चांगला संकेत आहे. भाषा हे एक मोठे विज्ञान आहे. विज्ञान हा भाषेचा अविभाज्य भाग आहे. त्यादृष्टीने एका वैैज्ञानिकाची निवड अत्यंत योग्य आहे. विज्ञान मातृभाषेमध्ये येणार नाही, तोवर त्याचा उपयोग सर्वसामान्यांना होणार नाही. विज्ञान सोप्या भाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम नारळीकरांनी केले आहे.

- डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

-----------------------------------

मराठी साहित्य संस्कृतीमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाचे महत्व वादातीत आहे. जयंत नारळीकर हे प्रज्ञावंत आणि प्रतिभावंतही आहेत. त्यांचे साधे, सरळ माणूसपण कोणालाही भावणारे आहे. शास्त्रज्ञ किती सर्वस्पर्शी असावा, याचे ते उत्तम आदर्श आहेत. मानवी कल्याणासंदर्भात त्यांची साहित्य सेवा उपयुक्त ठरली आहे. डॉ. नारळीकरांची साहित्यसंपदा स्वयंसिध्द आहे. शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक दृष्टीचा लेखक म्हणून त्यांची निवड सर्वार्थाने मराठीच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरक आहे.

- डॉ. श्रीपाल सबनीस, माजी संमेलनाध्यक्ष

--------------------------------

आजचे जग हे विज्ञानाचे जग आहे. विज्ञानाने जगाला नवी दिशा दाखवली, नवा पायंडा पाडला. यामध्ये अग्रणी असलेले नाव म्हणजे डॉ. जयंत नारळीकर. नारळीकर सरांनी मराठीपासून अलिप्त न राहता आपल्या ज्ञानाच्या आधारे लिखाण करत भाषेला समृध्द केले. त्यामुळे त्यांचा सन्मान अत्यंत योग्य आहे.

- डॉ. सदानंद मोरे, माजी संमेलनाध्यक्ष

----------------------------

नारळीकर सरांच्या रुपाने संमेलनाध्यक्षपदाचा मान प्रथमच विज्ञानकथा लेखकाला आणि आंतरराष्ट्रीय किर्तीच्या शास्त्रज्ञाला मिळाला आहे. त्यांची निवड यापूर्वीच व्हायला हवी होती. विज्ञानाचे दालन त्यांनी समृध्द केले आहे. विज्ञानाच्या नवीन संकल्पना त्यांनी कथांमधून मांडत विज्ञान सहजसोपे करुन दाखवले. साहित्य, कलात्मकता त्यांनी समृध्द केली. त्यांच्या निमित्ताने अनेक तरुण लेखक साहित्याकडे वळतील. त्यांचे अध्यक्षीय भाषणही महत्वाचे ठरणार आहे. महामंडळाने पुढील काळात विज्ञान कथा लेखनाबाबत नारळीकर सरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घ्याव्यात.

- लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष

-----------------------------

-------------

साहित्य निर्मितीबरोबरच साहित्य प्रसार, साहित्यिकाची लोकाभिमुखता, वाङ्ममयीन गुणवत्ता तसेच ज्येष्ठत्व लक्षात घेऊन निवड प्रक्रिया राबविली जात असल्याने महामंडळाला मन:पूर्वक धन्यवाद. माझे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले गेले आणि असंख्य रसिकांनी, वाचकांनी, मंडळांनी, संस्थांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या, त्यांचे मन:पूर्वक आभार.

- डॉ. रामचंद्र देखणे, संत साहित्याचे अभ्यासक

-----------------

ेमहाराष्ट्रात वैैज्ञानिक साहित्य फार कमी प्रमाणात लिहिले जाते. सत्याची कास धरुन विज्ञानाचे लेखन करणा-या नारळीकर सरांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याने विज्ञानाधारित साहित्याला चालना मिळेल. कलेमध्ये कायम विज्ञानाचा अभाव जाणवतो. ती पोकळी यानिमित्ताने भरुन निघेल. पुढच्या पिढीसाठी ही गोष्ट प्रेरणादायी ठरणार आहे.

- राजेंद्रकुमार सराफ, अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Science-based literature will get a boost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.