शालेय परिवहन समित्या कागदावरच
By Admin | Updated: June 18, 2015 00:20 IST2015-06-18T00:20:33+5:302015-06-18T00:20:33+5:30
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शाळांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या शालेय परिवहन समित्या कागदावरच मर्यादित राहिल्या आहेत.

शालेय परिवहन समित्या कागदावरच
राजानंद मोरे, पुणे
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शाळांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या शालेय परिवहन समित्या कागदावरच मर्यादित राहिल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे नियोजन करून, त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याचे काम या समित्यांनी करणे आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थितीत शहरात सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक बस, रिक्षा व व्हॅनमधून धोकादायक पद्धतीने विद्यार्थी वाहतूक केली जात आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी किंवा सुटल्यानंतर रस्त्यावर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे बहुतेक शाळा दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले.
शालेय; तसेच परिवहन विभागाने सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने नियमावली तयार केली आहे. विशेषत: स्कूल बसबाबत विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेत शालेय परिवहन समिती स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरातील सुमारे ८० टक्क्यांपेक्षा जास्त शाळांमध्ये ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत योग्य नियोजन करण्याची जबाबदारी या समित्यांवर टाकण्यात आली आहे. स्कूल बस, रिक्षा, व्हॅनचालकांची बैठक घेणे, त्यांना विद्यार्थी सुरक्षिततेबाबत सूचना देणे, बसचालकाकडून सर्व नियम पाळले जात आहेत किंवा नाही, याची तपासणी करणे, रिक्षा, व्हॅनमधील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत दक्षता घेण्याची जबाबदारी समितीवर निश्चित करण्यात आली आहे. मात्र, बहुतेक शाळांंकडून विद्यार्थी वाहतुकीकडे दुर्लक्ष केले जात आहेत़
स्कूल बसमध्ये महिला किंवा पुरुष सहायक, अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार पेटी असणे आवश्यक आहे. तसेच, बस सुरू असताना दरवाजा बंद करणेही सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मात्र, याकडे बसचालक; तसेच सहायकही काणाडोळा करताना दिसतात. काही बसेसमध्ये सहायकही आढळून आले नाहीत; तसेच क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या बसही पाहायला मिळाल्या.
रिक्षांना केवळ प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना देण्यात आला आहे. या नियमानुसार १२ वर्षांखालील मुले असल्यास रिक्षामध्ये ४ विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यास परवानगी असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगतात. मात्र, एका रिक्षामधून १० पेक्षा जास्त विद्यार्थी दाटीवाटीने नेले जात आहेत.
रिक्षाप्रमाणेच व्हॅनमधूनही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वाहतूक केली जाते. काही ठराविक पद्धतीच्या व्हॅनलाच यासाठी परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना नसलेल्या व्हॅन विद्यार्थी वाहतूक करताना दिसून आल्या.
नियमबाह्य
विद्यार्थी वाहतुकीवर होणार कारवाई
नियमबाह्य विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. ही कारवाई स्कूल बससह रिक्षा व व्हॅनवरही केली जाणार आहे. त्यासाठी सध्या तीन पथके तयार करण्यात आली आहेत. पुढील आठवड्यात आणखी तीन पथके या कारवाईसाठी दिली जातील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून वाहतूक करणाऱ्यांविरोधात यापुढे कडक कारवाई केली
जाणार आहे.
- जितेंद्र पाटील,
प्रादेशिक परिवहन अधिकारी