मुख्याध्यापक दाखले घेऊन गावाला
By Admin | Updated: July 3, 2016 04:15 IST2016-07-03T04:15:02+5:302016-07-03T04:15:02+5:30
अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून विद्यार्थ्यांना निश्चित कालावधीत मूळ कागदपत्र सादर करण्याचे बंधन आहे. मात्र, पाषाण येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी

मुख्याध्यापक दाखले घेऊन गावाला
पुणे : अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून विद्यार्थ्यांना निश्चित कालावधीत मूळ कागदपत्र सादर करण्याचे बंधन आहे. मात्र, पाषाण येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी अकरावीमध्ये तात्पुरता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे दाखले गावी नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना कोट्यातील प्रवेश घेताना अडचणी येत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने संबंधित मुख्याध्यापकांना चौकशीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयात बोलाविले आहे.
पाषाण येथील गोरा कुंभार उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हे काही दिवसांपूर्वी खानदेशात आपल्या गावी गेले होते. मात्र, गावी जाताना त्यांनी विद्यार्थ्यांचे दाखले सोबत नेल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्या यादीतील प्रवेशानंतर इन हाऊस, व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोट्याची प्रक्रिया राबविली जात आहे.
पहिल्या गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही विविध कोट्यातील प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होती. मात्र, गोरा कुंभार विद्यालयातील ५० रुपये शुल्क भरून घेतलेला प्रवेश रद्द करून मूळ कागदपत्र घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थी व पालकांना दाखला देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यालयांकडे याबाबत विचारणा केली असता मुख्याध्यापक दाखले घेऊन गावी गेल्याचे सांगण्यात आले.
अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्र सादर करावे लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. गोरा कुंभार शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे दाखले गावी नेल्याचे शाळेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना अडचणी आल्या. मात्र, सर्व विद्यार्थ्यांचे दाखले देण्यात आले आहेत. मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचे दाखले घेऊन गावी गेले होते का? याबाबत माहिती घेण्यासाठी त्यांना शिक्षण उपसंचालक कार्यालयात बोलाविण्यात आले आहे. सर्व माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
- मीनाक्षी राऊत, सहायक शिक्षण संचालक, पुणे विभाग