शिष्यवृत्ती घोटाळा तंत्रशिक्षणच्या रडारवर
By Admin | Updated: September 20, 2015 00:39 IST2015-09-20T00:39:06+5:302015-09-20T00:39:06+5:30
ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिष्यवृत्ती वाटपाबाबत अनियमितता किंवा घोटाळा झाल्याचे आढळून आले, अशा शैक्षणिक संस्थांची तीन वर्षांची माहिती राज्य तंत्रशिक्षण विभागाने

शिष्यवृत्ती घोटाळा तंत्रशिक्षणच्या रडारवर
पुणे : ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिष्यवृत्ती वाटपाबाबत अनियमितता किंवा घोटाळा झाल्याचे आढळून आले, अशा शैक्षणिक संस्थांची तीन वर्षांची माहिती राज्य तंत्रशिक्षण विभागाने सर्व विभागीय कार्यालयांकडून मागवली आहे.
गेल्या काही काळांत समोर आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर संचालनालयाकडून ही माहिती मागविण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने शिष्यवृत्तीमध्ये घोटाळा झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यातच काही शैक्षणिक संस्था आपल्या स्तरावर प्रवेशाचे प्रकारही दिसतात. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या विभागीय कार्यालयामार्फतच सर्व शिष्यवृत्तीबाबतची कार्यवाही सुरू असल्यामुळे अशा संस्था माहीत असतील, तर त्या संस्थांची माहिती राज्य संचालनालयाकडे पाठविण्याचे आदेश तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सुभाष महाजन यांनी दिले.
संचालनालयाकडून गेल्या ३ वर्षांची माहिती मागविली आहे. त्यामध्ये एससी व एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी पात्र विद्यार्थी संख्या, त्यापैकी शिफारस केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, प्रतिवर्षी प्रतिविद्यार्थी महाविद्यालयाचे शुल्क, परीक्षा शुल्क, शिष्यवृत्ती, त्या संस्थेविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असेल, तर त्याबाबतची माहिती, तसेच अन्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांमधील किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, कोणाला मिळाली नाही, त्याची कारणे आदींबाबतच्या माहितीचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
मागील काही वर्षांत शिष्यवृत्तीबाबतच्या तक्रारी वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत होत्या. ते समाजकल्याणशी संबंधित होते, तरीही आम्हीदेखील आमच्या पातळीवर काही शिष्यवृत्तीबाबत माहिती मागविली आहे. संस्थास्तरावर प्रवेश दिल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.
- डॉ. सुभाष महाजन, संचालक, राज्य तंत्रशिक्षण संचालनालय