शिष्यवृत्ती आॅनलाईन
By Admin | Updated: June 9, 2014 05:06 IST2014-06-09T05:06:56+5:302014-06-09T05:06:56+5:30
शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसाह्य म्हणून महापालिकेकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती यावर्षीपासून आॅनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे.

शिष्यवृत्ती आॅनलाईन
पुणे : शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसाह्य म्हणून महापालिकेकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती यावर्षीपासून आॅनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. त्यासाठीची यंत्रणा महापालिकेच्या संगणक आणि सांख्यिकी विभागाने विकसित केली असून, त्याची नुकतीच चाचणी घेण्यात आली असल्याची माहिती नागरवस्ती विभागाचे प्रमुख हनुमंत नाझीरकर यांनी दिली.
महापालिका हद्दीत राहणाऱ्या १० वी, १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना नागरवस्ती विभागाकडून १०वीसाठी मौलाना अबुल कलाम आझाद अर्थसाह्य योजनेतून प्रत्येकी १५ हजार आणि १२ वीसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाह्य योजनेतून २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेसाठी महापालिकेकडून दर वर्षी लेखी स्वरूपातील अर्ज आणि संबंधित विद्यार्थ्यांची कागदपत्रे पाठविण्यात येतात. अर्जांची संख्या दर वर्षी आठ ते दहा हजारांपर्यंत असते, त्यामुळे या अर्जांची छाननी करण्यास लाभार्थी ठरविण्यास; तसेच अंतिम यादी जाहीर करण्यास प्रशासनास अनेक महिने लागतात. त्यामुळे जुलै महिन्यात ही प्रक्रिया सुरू करून, मुलांना शिष्यवृत्तीचे धनादेश मिळण्यास नवीन वर्षाचा महिना उजाडतो. ही बाब लक्षात घेऊन यावर्षी पासून या शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज आॅनलाईन भरून घेण्यात येणार असून, कागदपत्रेही आॅनलाईनच घेण्यात येणार आहेत. त्यासाठीची यंत्रणा पालिकेच्या संगणक विभागाने विकसित केली असून, त्याची चाचणीही नुकतीच घेण्यात आली आहे. (प्रतिनिधी)