सांगा, नोट ओळखायची कशी?
By Admin | Updated: November 16, 2016 02:37 IST2016-11-16T02:37:23+5:302016-11-16T02:37:23+5:30
पंतप्रधान मोदी यांनी पाचशे आणि एक हजाराच्या नोटा दैनंदिन व्यवहारात बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. अचानक जाहीर झालेल्या या निर्णयामुळे

सांगा, नोट ओळखायची कशी?
भोसरी : पंतप्रधान मोदी यांनी पाचशे आणि एक हजाराच्या नोटा दैनंदिन व्यवहारात बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. अचानक जाहीर झालेल्या या निर्णयामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच दोन हजारांची नवी नोट आकाराने व स्पर्शाने ओळखणे अंध बांधवांना सहजशक्य नसल्याने बँकांच्या रांगेत दिवस-दिवस थांबून मिळालेली दोन हजारांची नोट ओळखायची कशी, या गोंधळात अंध नागरिक सापडले आहेत.
नवीन नोटांच्या अचानक बदलामुळे पाचशे रुपयांची व दोन हजारांची नवी नोट ओळखण्यास अंध व्यक्तींना अडचणी येत असल्याचे दिसून येते. सर्वसाधारणपणे नवीन नोटांच्या लांबी, रुंदी व जाडी अंध बांधवांना स्पर्शाने ओळखता येते. नवी दोन हजारांची नोट आकाराने १००च्या नोटेपेक्षाही लहान आहे. नवीन नोटांचे नेमके वेगळेपण काय आहे, याची सविस्तर माहिती अंध लोकांना करून देण्यात आली नसल्याने सुरुवातीच्या काळात नवीन आणि बनावट नोटांमधील फरक ओळखणे कठीण जाणार असल्याचे अंध नागरिक सांगतात. नवीन नोटांचा आकार, त्याचा रंग, वैशिष्ट्ये याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती सरकारने अंध व्यक्तींना सांगितली नसल्याने अंध नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे.
नव्या दोन हजारांच्या नोटेचा आकार लहान असल्याने ती २० रुपयांची नोट आहे की दोन हजारांची हे ओळखणे कठीण जात आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही किमतीची नोट तयार करण्यासाठी विशिष्ट कागदाचा वापर केला जातो. कोणत्याही चलनी नोटांवरील
आकडे दिसत नसल्याने त्यांच्यामध्ये अत्यंत सुक्ष्म अशी काही वैशिष्ट्ये उपलब्ध करून दिली जातात. संबंधित नोटेच्या कागदाचा दर्जा व स्पर्शज्ञानाने नोट ओळखणे सोपे जाते. मात्र, नव्या दोन हजारांच्या नोटेचा दर्जा इतर जुन्या नोटांपेक्षा कमी आहे. नवी नोट हातात घेतल्यानंतर ती खेळण्यातील आहे की काय असा भास होतो, असे काही अंध नागरिकांनी सांगितले.(वार्ताहर)