पुणे : पाच महिला कलाकारांच्या एकत्रित सादरीकरणाची ‘मोहिनी’ आणि युवा गायक विराज जोशी यांचा रंगतदार ''पूरिया'' यामुळे सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीचे पहिले सत्र गाजले. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल येथे ७० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव सुरू असून, तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीचे सत्र वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
गायिका रुचिरा केदार, सतारवादक सहाना बॅनर्जी, तबलावादक सावनी तळवलकर, पखवाज वादक अनुजा बोरुडे-शिंदे आणि हार्मोनियम वादक आदिती गराडे या पाच कलावंतांनी वैविध्यपूर्ण असा ''मोहिनी'' संगीत संवाद एकत्रित गायन- वादनातून सादर केला.
राग भीमपलासमधील ''पार करो'' ही रचना, द्रुत एकतालातील दिर दिर तानुम तन देरेना हा तराणा, तबला आणि पखवाज यांची जुगलबंदी, हार्मोनियमची सुरेल साथ यांचा एकमेळ रसिकांची दाद मिळवणारा ठरला. ''माझे माहेर पंढरी...'' हा अभंग सादर करत, या पाचही कलावतांनी आपल्या सादरीकरणाची मोहिनी रसिकांवर घातली.
त्यानंतर युवा गायक विराज जोशी यांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून आपले आजोबा पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनाची आठवण करून दिली. किराणा घराण्याचा खास राग मानला जाणारा राग पूरिया विराज यांनी सुव्यवस्थित पद्धतीने पेश केला. विराज यांनी ''ठुमक पग पायल बाजे...'' ही रचनाही सादर केली. शांत, संयत मांडणी, हे या गायनाचे वैशिष्ट्य होते. विराज यांनी विलंबित आलापचारीतून सायंकाळचे वातावरण उभे केले.
आपले आजोबा भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या ''कान्होबा तुझी घोंगडी चांगली'' या अभंगाचे अतिशय भावपूर्ण गायन करून विराज यांनी अतिशय रंगलेल्या गायनाचा समारोप केला. त्यांना अविनाश दिघे (हार्मोनियम), पांडुरंग पवार (तबला), ज्ञानेश्वर दुधाणे (पखवाज), राहुल गोळे (ऑर्गन), अभयसिंह वाघचौरे व दशरथ चव्हाण (स्वरसाज), दिगंबर शेड्युळे व मोबिन मिरजकर (तानपुरा) यांनी अनुरूप साथ केली. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने विजय मराठे व उदय घारे यांनी विराज जोशी यांचा सत्कार केला.