पुणे : सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची आज बुधवारी दुपारी दिमाखदार सुरवात झाली. तत्पुर्वी प्रथेनूसार संभाजी बागेतील सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महोत्सवाचा प्रारंभ डाॅ. कृष्णा बल्लेश यांच्या सुमधूर सनईवादनाने झाली. २२ डिसेंबरपर्यंत या महोत्सवात रसिकांना गायन, वादनाची मेजवानी मिळणार आहे.
दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानातील सवाई गंधर्वांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करीत ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आज बुधवारी सुरुवात झाली. दरवर्षी सवाई गंधर्व यांचे कुटुंबीय आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे कुटुंबीय एकत्र येत सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला हार घालत अभिवादन करत असतात. गेली ५० हून अधिक वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरु आहे. आज या प्रसंगी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, विराज जोशी, शुभदा मुळगुंद, पं. उपेंद्र भट, आनंद भाटे, डॉ प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे, शैला देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडा संकुल या ठिकाणी १८ ते २२ डिसेंबर दरम्यान ७० वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव होत असून कार्यक्रमस्थळी सुमारे हजारो संगीत रसिकांना सामावून घेणा-या भव्यदिव्य अशा मांडवाची उभारणी करण्यात आली असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.
वर्षभरात दिवंगत झालेल्या कलाकारांना श्रद्धांजली अर्पण करून यंदाच्या महोत्सवाला सुरुवात होईल. सुरुवातीला भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे शिष्य डॉ. एस बल्लेश व त्यांचे सुपुत्र डॉ कृष्णा बल्लेश यांचे सुमधुर सनईवादन सुरू झाले. यानंतर किराणा घराण्याचे गायक उस्ताद मुबारक अली खान आणि गायक सुधाकर चव्हाण यांच्या शिष्या व सुपुत्री शाश्वती चव्हाण- झुरुंगे आपली गायनसेवा प्रस्तुत करणार आहेत. यांनतर आग्रा व जयपूर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक राम देशपांडे यांचे गायन होईल. व्हायोलिन वादक डॉ. एल सुब्रमण्यम यांचे कर्नाटक शैलीतील वादन ऐकण्याची संधी यानंतर रसिकांना मिळेल. पतियाळा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं. अजय चक्रबर्ती यांच्या गायनाने आज पहिल्या दिवसाचा समारोप होईल.महोत्सवासाठी येणा-या रसिकांच्या दुचाकी व चारचाकी गाड्यांसाठी सुसज्ज पार्किंग, कार्यक्रमाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना घेता यावा यासाठी नेहमीप्रमाणे मोठ्या एलईडी स्क्रीन्स व अद्ययावत ध्वनी यंत्रणा उभारली आहे. पुरुष व महिलांसाठी अद्ययावत असे प्रसाधनगृह मंडपाच्या मागील बाजूस उभारण्यात आली आहेत. पीएमपीएमएल तर्फे कार्यक्रम संपल्यानंतर विशेष बससेवा संगीत रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.