सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प मंजूर
By Admin | Updated: March 12, 2017 03:16 IST2017-03-12T03:16:11+5:302017-03-12T03:16:11+5:30
विद्यार्थीकेंद्री व संशोधनाला चालना देणाऱ्या विविध नवीन योजनांचा समावेश असलेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ६७८ कोटी खर्चाचा अर्थसंकल्प शनिवारी अधिसभेत मंजूर करण्यात आला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प मंजूर
पुणे : विद्यार्थीकेंद्री व संशोधनाला चालना देणाऱ्या विविध नवीन योजनांचा समावेश असलेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ६७८ कोटी खर्चाचा अर्थसंकल्प शनिवारी अधिसभेत मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थी व संशोधनासाठी सात नवीन योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठीच्या विविध योजना व सोयी-सुविधांसाठी ४२ कोटी ४९ लाख रुपयांची तर संशोधनासाठी १३ कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक झाली.
यापूर्वी व्यवस्थापन परिषदेतील सदस्यांकडून अर्थसंकल्प सादर केला जात होता. मात्र, नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्याने त्यातील तरतुदीनुसार वित्त व लेखा अधिकारी डॉ. विद्या गारगोटे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. सुमारे ५७६ कोटी रुपये जमेचा आणि १०१ कोटी रुपये तुटीचा हा अर्थसंकल्प आहे. कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू यांच्यासह नामनिर्देशित
आमदार गौतम चाबुकस्वार आणि विद्यापीठाचे सहा अधिकारी या वेळी उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ च्या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी २४१ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे.(प्रतिनिधी)