‘सौं’च्या तिकिटासाठी सरसावले पतीराज!
By Admin | Updated: January 26, 2017 00:00 IST2017-01-26T00:00:42+5:302017-01-26T00:00:42+5:30
शिक्रापूर-सणसवाडी गटात ‘महिलाराज’ येणार असल्याने राजकारणातील या भागातील दिग्गज नेत्यांची राजकीय गणिते बिघडली

‘सौं’च्या तिकिटासाठी सरसावले पतीराज!
शिक्रापूर : शिक्रापूर-सणसवाडी गटात ‘महिलाराज’ येणार असल्याने राजकारणातील या भागातील दिग्गज नेत्यांची राजकीय गणिते बिघडली असून, आता ‘पत्नीला’ राजकारणात उतरवण्याची जय्यत तयारी अनेकांनी केली आहे.
मोठ्या प्रमाणावर कारखानदारी व विकासाच्या प्रवाहात मागील दहा वर्षांत पुणे-नगर रोडवरील शिक्रापूर गटाला शिरूरच्या राजकारणात व जिल्ह्याच्या राजकारणात चांगले स्थान प्राप्त झाले. फेररचनेने नव्याने तयार झालेल्या शिक्रापूर-सणसवाडी गटात जिल्हा परिषदेसाठी ओबीसी स्त्री, शिक्रापूर पंचायत समिती गणात इतर मागासवर्गीय महिला, तर सणसवाडी गणात सर्वसाधारण महिला आरक्षण निघाले. एकूण ३४०६९ मतदार असणाऱ्या या गटात मोठी चुरस पाहावयास मिळणार आहे. भाजपाचे आमदार बाबूराव पाचर्णे व राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांच्या मतदारसंघातील या गटात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गटात मागील आठवडाभरात लक्ष केंद्रित केले असून, मोठी राजकीय खेळी येत्या काही दिवसांत या गटात पाहायला मिळणार आहे. पक्षीय राजकारणाच्या डावपेचात भाजपा, सेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस-कॉँग्रेस यांच्यातील कुरघोडीचे राजकारण ‘पक्ष बदलाची’ समीकरणे पुढे येत असून, या भागातील जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती मंगलदास बांदल यांच्या राजकीय खेळीकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. या गटातील राजकीय घडामोडीचा परिणाम शिरूरच्या इतर गटांवरदेखील होणार असल्याने सर्व पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी या गटाकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यात अंतर्गत तडजोडी झाल्यास वेगळे चित्र येत्या काळात पाहावयास मिळणार असून भाजप व राष्ट्रवादीच्या गटात तणावपूर्वक शांतता या भागात दिसत आहे.
शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील राजकीय उलथापालथ व राजकीय डावपेचात नवीन चेहरा शिक्रापूरचे उपसरपंच आबाराजे मांढरे यांनी या भागात राजकीय गणिते बदलण्यास भाग पाडले होते. त्याचा परिणाम येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत होईल, अशी चर्चा सध्या या भागात होत आहे. तर जाती-पातीच्या राजकारणात स्थानिक मतदारांबरोबर मोठ्या प्रमाणावर बाहेरील गावातील व जिल्ह्यातील कामगारवर्गाचे मतदान या गटात मोठ्या प्रमाणावर वाढले असून, त्यांची गोळाबेरीज काढताना इच्छुक उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. (वार्ताहर)