धोंडे खायला जावई निघाले सासुरवाडीला
By Admin | Updated: June 18, 2015 22:56 IST2015-06-18T22:56:14+5:302015-06-18T22:56:14+5:30
अधिकमास सुरू झाला असून अधिकमासाचे महत्त्व हिंदू धर्मशास्त्रामध्ये मोठे मानले जाते. या महिन्यात लाडक्या जावयाला अधिकमासाचे वाण

धोंडे खायला जावई निघाले सासुरवाडीला
राजेगाव : अधिकमास सुरू झाला असून अधिकमासाचे महत्त्व हिंदू धर्मशास्त्रामध्ये मोठे मानले जाते. या महिन्यात लाडक्या जावयाला अधिकमासाचे वाण दिले जाते. जावयाला पुरणाचे धोंडे (दिंडे) खायला देणे यावरूनच अधिकमासास ‘धोंड्याचा महिना’ असे म्हणतात. जावई व मुलीला धोंड्याच्या बरोबरीने नवीन कपडेही दिले जातात.
विशेषत: यावर्षीच लग्न झालेल्या जावयाला धोंडे देण्याचा कार्यक्रम विशेष असतो. जवळजवळ ३३ महिन्यांनंतर हा महिना अधिक केला जातो. त्यामुळे त्याला अधिकमास असे म्हटले जाते. जावयाला श्रीविष्णू म्हणजेच नारायणाचे रूप मानले जाते, तर मुलीला (लेकीस) विष्णुपत्नी लक्ष्मीचे रूप मानले जात असल्याने त्यांना वाण देण्याने मोठे पुण्य लाभते, असे मानले जाते.
संस्कृतमध्ये ‘अपूप’ म्हणजेच अनारसा होय. असे हे ३३ अनारशांचे वाण चांदीच्या ताटात सुवर्ण मोहरांसह जावयाला देण्याची प्रथा आहे. जावयाला वाण दिल्यावर पृथ्वीलोक; तसेच स्वर्गलोकाचेही पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. हे दान देताना अनारशाऐवजी बत्तासे किंवा म्हैसूरपाक यांचाही समावेश केला जातो. अधिकमासाच्या पवित्र कालावधीत दीपदानाचे महत्त्व फार मोठे आहे. दीप म्हणजे विष्णुपत्नी लक्ष्मी हिचे प्रतीक, म्हणजेच समृद्धीचे प्रतीक मानले जाते. चांदीच्या ताटात निरांजन म्हणजे दिवा (दीप) दिला जातो. सोने किंवा चांदीऐवजी इतर धातू तांबे, पितळ यांचाही दिवा देण्याची प्रथा आहे.
आपल्या ऐपतीनुसार देवाच्या पूजेची चांदीची उपकरणी (निरांजन, पंचारती, तबक, तांब्या, भांडे, कलश, कोयरी, कुंकवाचा करंडा, ताम्हन, पळी, पंचपात्र, उदबत्तीची सोंगटी, घंटा, अभिषेक पात्र इ.) दानात दिली जातात.
सवाष्णींच्या ओट्या भरणे; तसेच चांदीची जोडवी देणे, लक्ष्मीस प्रिय असणारे तांबुलदान अशी दाने दिली जातात. (वार्ताहर)
शुभकार्यास काळ अनुकूल नाही
मलठण येथील प्रसिद्ध पुरोहित सचिन अवचट यांचे मते, हा महिना १३ वा म्हणून मळासारखा अधिक झालेला म्हणून त्याला ‘मलमास’ संबोधतात. या कालावधीत विवाह, उपनयन आदी धार्मिक संस्कार; तसेच गृहप्रवेश, वास्तुप्रवेश, देवप्रतिष्ठा, चौलकर्म इ. गोष्टी केल्या जात नाहीत. शुभकार्यास हा काळ अनुकूल मानला जात नाही.