ससूनमधील चौकी बंद; ताटकळले मृतदेह

By Admin | Updated: July 10, 2015 02:29 IST2015-07-10T02:29:06+5:302015-07-10T02:29:06+5:30

ससून हॉस्पिटलमधील पोलीस चौकी ४ दिवसांपासून कुलूपबंद ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील मृतदेहांचे पंचनामे होण्याचे काम ठप्प झाले आहे.

Sasson's closure closed; Dead body | ससूनमधील चौकी बंद; ताटकळले मृतदेह

ससूनमधील चौकी बंद; ताटकळले मृतदेह

दीपक जाधव, पुणे
ससून हॉस्पिटलमधील पोलीस चौकी ४ दिवसांपासून कुलूपबंद ठेवण्यात आल्याने जिल्ह्यातील मृतदेहांचे पंचनामे होण्याचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे शवागारात मृतदेह ठेवून जिल्ह्याच्या ठिकाणांहून ठाण्यातून पोलीस येण्याची दोन-दोन दिवस वाट पाहण्याची अत्यंत वाईट वेळ नातेवाइकांवर आली आहे. आप्तस्वकीयांना गमावल्याचे दु:ख उराशी बाळगून पोलिसांच्या अनागोंदी कारभाराचा मारा नातेवाइकांना निमूटपणे सहन करावा लागत आहे.
ससून हे राज्यातील महत्त्वाचे शासकीय रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये बायपाससह अनेक मोठ्या शस्त्रक्रिया, दुर्धर आजारांवर उपचार केले जात असल्याने संपूर्ण राज्यातून ससूनमध्ये रुग्ण येत असतात. खून, अपघात, आत्महत्या व इतर संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणांमध्ये मृतदेहांचा पंचनामा तसेच विच्छेदन करूनच ते नातेवाइकांच्या ताब्यात दिले जाते.
जेजुरीजवळील नावळी गावच्या विद्या चावरे या विवाहितेने बुधवारी पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
रात्री तिचा मृत्यू झाला. ससूनमधील चौकी बंद असल्याने रात्री जेजुरी पोलीस ठाण्याला घटनेची माहिती देऊन पंचनाम्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी पाठविण्याची विनंती नातेवाइकांनी केली. मात्र, रात्रीची वेळ असल्याने पोलीस आले नाहीत. सकाळी तरी त्यांनी लवकर येणे अपेक्षित होते; मात्र दुपारी ३ वाजल्यानंतर ते ससूनमध्ये आले. त्यानंतर पंचनामा वगैरे सोपस्कार पार पाडून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात सोपविण्यात आला.
शवागारामध्ये मृतदेह ठेवून जेजुरीहून पोलीस येण्याची वाट पाहत त्यांना संपूर्ण रात्र आणि एक दिवस काढावा लागला. दोन दिवसांपूर्वी मंचर येथील एका तरुणाचा ससून रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. त्याच्या नातेवाइकांनाही पोलीस येऊन पंचनामा होण्याची मोठी वाट पाहावी लागली. गेल्या ४ दिवसांपासून असे अनेक प्रकार घडत आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Sasson's closure closed; Dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.