सराईत घरफोड्या करणाऱ्यास अटक

By Admin | Updated: March 4, 2015 00:38 IST2015-03-04T00:38:23+5:302015-03-04T00:38:23+5:30

सांगवी परिसरात घरफोडी करणाऱ्या संजय रामभाऊ राखुंडे (वय ३६, रा. क्रांतीनगर, पिंपळे निलख) या सराईत चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट चारने पिंपळे निलख येथून अटक केली.

Saraiat Ghar Ghodayadar arrested | सराईत घरफोड्या करणाऱ्यास अटक

सराईत घरफोड्या करणाऱ्यास अटक

पिंपरी : सांगवी परिसरात घरफोडी करणाऱ्या संजय रामभाऊ राखुंडे (वय ३६, रा. क्रांतीनगर, पिंपळे निलख) या सराईत चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट चारने पिंपळे निलख येथून अटक केली. त्याने सांगवी भागामध्ये १६ ठिकाणी घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्याच्याकडून गॅस सिलिंडर, लॅपटॉप, डीव्हीडी प्लेअर, ओव्हन, होम थिएटर, एलसीडी टीव्ही, असा एकूण १३ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरलेल्या वस्तूंची विक्री करण्यास मदत करणारा त्याचा साथीदार राहुल मनसाराम अहिरे (वय ३५, रा. सुनीलनगर, म्हाळुंगे, मूळ रा. खाजोळे, जि. जळगाव) या आरोपीलाही ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी परिसरामध्ये घरफोडीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने युनिट चारचे पथक आरोपींच्या मागावर होते. पोलिसांना खबऱ्यामार्फत आरोपीची माहिती मिळाली. त्यानुसार २० फेब्रुवारीला त्याला अटक करण्यात आली. चौकशी केली असता, त्याने सांगवी परिसरामध्ये घरफोड्या केल्याचे कबूल केले. सांगवी भागात सोळा ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून घरफोडीमध्ये चोरलेला मुद्देमाल जप्त केला आहे. बंद घराचे कुलूप कटावणीच्या साहाय्याने तोडून आत प्रवेश करून घरातील मिळेल त्या सामानाची तो चोरी करायचा. चोरलेला माल घेऊन जाण्यासाठी दुचाकी किंवा रिक्षाचा वापर करायचा. घरामध्ये काही सामान मिळाले नाही, तर तो गॅस सिलिंडरची चोरी करायचा. आपल्या घरी खाणावळ होती, ती आता बंद केली असल्याचे सांगून हे सिलिंडर तो विकत असे.
चोरलेला माल विकण्यासाठी साथीदार राहुल आहिरे याची तो मदत घेत असे. चोरलेल्या वस्तू कमी किमतीमध्ये परिसरातील लोकांना विक्री करीत. संजय राखुंडे हा सराईत असून, त्याच्यावर पुण्यातील विश्रामबाग आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल आहेत. त्याने या ठाण्यांच्या हद्दीमध्ये वाहनचोरीचे गुन्हे केले होते. त्या वेळीही त्याला अटक करण्यात आली होती. या कारवाईत पोलीस निरीक्षक (गुन्हे) लक्ष्मण बोराटे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक नितीन भोयर, विजय महाजन, हवालदार धनंजय चव्हाण, राजू मोरे, गणेश काळे, संतोष बर्गे, अर्जुन भांबुरे, शशिकांत शिंदे, राजू मचे सहभागी झाले होते.

१७ तोळे सोने, ११ एलसीडी अन् बरेच काही
४पोलिसांनी चोरट्याकडून १७ तोळे सोन्याचे दागिने, प्लेझर मोपेड, रिक्षा, १० एलसीडी टीव्ही, डीव्हीडी प्लेअर, ७ गॅस सिलिंडर, ओव्हन, प्रिंटर, २ संगणक, होम थिएटर आणि ११ मोबाईल, असा एकूण १३ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
४मूळचा अमरावतीचा असलेला आरोपी सांगवी परिसरामध्ये रिक्षा चालवितो. रिक्षा चालविताना दिवसभर घरांची टेहाळणी करीत असे. ज्या ठिकाणी सुरक्षारक्षक नाही, अशा गृहसंस्थांची निवड करून तळमजल्यावर बंद असलेली घरे हे त्याचे चोरीचे टार्गेट होते. घर किंवा कार्यालय अशाच ठिकाणी तो घरफोडी करायचा.

Web Title: Saraiat Ghar Ghodayadar arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.