‘स्वरभास्करा’ला सप्तसुरांनी सुमनांजली
By Admin | Updated: January 23, 2017 03:17 IST2017-01-23T03:17:52+5:302017-01-23T03:17:52+5:30
‘स्वरभास्करा’ला दिलेली सप्तसुरांची सुमनांजली... बहारदार गायन आणि कानाला तृप्त करणारी वादनाची अद्वितीय जुगलबंदी

‘स्वरभास्करा’ला सप्तसुरांनी सुमनांजली
पुणे : ‘स्वरभास्करा’ला दिलेली सप्तसुरांची सुमनांजली... बहारदार गायन आणि कानाला तृप्त करणारी वादनाची अद्वितीय जुगलबंदी... अशा बहारदार मैफलीतून रविवारी ‘संगत संगीत’ महोत्सवातील सकाळचे सत्र रंगले. पंडितजींच्या एरवी कधीही ऐकायला न मिळणाऱ्या गायन-वादनाच्या सुरेल सादरीकरणातून रसिकांची पहाट ‘स्वरमयी’ झाली.
पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ‘संगत संगीत’ महोत्सवाचे हे सत्र ‘स्वरभास्करा’ला समर्पित करण्यात आले. पंडितजींचे पुत्र आणि शिष्य श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने सत्राला प्रारंभ झाला. त्यांना संवादिनीवर अविनाश दिघे यांनी तर तबल्यावर महेश देसाई यांनी साथसंगत केली.
उपेंद्र भट यांनी ‘कोमल रिषभ आसावरी’ या अनवट रागाने मैफलीला प्रारंभ केला. ‘सब मेरा वो ही’ आणि ‘मैं तो तुमरो दास जनम जनम से’ या बंदिशीनंतर त्यांनी ‘चिरंजीव राहो जगी नाम’ ही पं. भीमसेन जोशी यांनी स्वरबद्ध केलेली आणि गायलेली रचना सादर केली. ‘अवघा आनंदी आनंद’ या भक्तिरचनेने मैफलीची सांगता केली. सवाई गंधर्व महोत्सव गाजविलेल्या लक्ष्य मोहन गुप्ता आणि आयुष मोहन गुप्ता या बंधूंनी सतार आणि सरोद सहवादनातून ‘मियाँ की तोडी’ राग सादर केला. या रागाचा आलाप, जोड, धमार यातून त्यांनी रागाचे सौंदर्य उलगडले. त्यानंतर हिमांशू महंत (तबला) आणि ज्ञानेश्वर देशमुख यांची वाद्यांची जुगलबंदी रसिकांनी अनुभवली. (प्रतिनिधी)