‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपटाचे उद्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2015 01:05 IST2015-05-17T01:05:26+5:302015-05-17T01:05:26+5:30
उडणारी भिंत... रेड्याच्या तोंडातून वेदपठण... ज्ञानेश्वरांची निरागस प्रतिमा... या गोष्टी डोळ्यांसमोर आल्या, की चटकन ‘संत ज्ञानेश्वर’ हा बोलपट आठवतो.

‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपटाचे उद्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण
पुणे : उडणारी भिंत... रेड्याच्या तोंडातून वेदपठण... ज्ञानेश्वरांची निरागस प्रतिमा... या गोष्टी डोळ्यांसमोर आल्या, की चटकन ‘संत ज्ञानेश्वर’ हा बोलपट आठवतो. प्रभात फिल्म कंपनीच्या या चित्रपटाने मराठी चित्रपटांच्या मांदियाळीत एक नवा मानदंडच प्रस्थापित केला नाही तर सातासमुद्रापारही ‘ज्ञानदेव लाईट आॅफ एशिया’ अशा समर्पक नावाने अमेरिकेत हा चित्रपट प्रदर्शित झाला, हे त्याचे आगळेवेगळे वैशिष्ट्य! मराठी चित्रपट इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेलेला हा चित्रपट उद्या (सोमवारी) अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.
दामले-फत्तेलाल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १८ मे १९४0 मध्ये मुंबई आणि पुण्यात एकाच दिवशी प्रदर्शित झाला होता, त्याला आता ७५ वर्षांचा काळ लोटत आहे. या चित्रपटनिर्मितीमागच्या अनेक आठवणींना अनिल दामले यांनी उजाळा दिला. ते म्हणाले, ‘‘पुण्यात प्रदर्शनाच्या दिवशी संत ज्ञानेश्वर चित्रपटाची प्रिंट वाजत-गाजत, टाळ मृदंगांच्या गजरात व ग्यानबा तुकारामच्या घोषात चित्रपटगृहावर आणण्यात आली होती. प्रेक्षक ‘ग्यानबा-तुकाराम’च्या घोषात रंगून गेले होते. तब्बल ३६ आठवडे हा चित्रपट मुंबई-पुण्यात चालला. प्रभातचे १९३२ मध्ये पुण्यातल्या प्रशस्त जागेत स्थलांतर झाले होते. दामले-फत्तेलाल यांनी १९३६मध्ये दिग्दर्शित केलेला संत तुकाराम चित्रपट देशभरात गाजला. त्यानंतर त्यांनी ‘गोपाळ कृष्ण’ दिग्दर्शित केला.
याही चित्रपटाला घवघवीत यश मिळालं.
कंपनीला नाव आणि पैसाही मिळाला. तेव्हाच दामल्यांनी, पुढचे चित्रपट संतपट काढायचे असे मनात ठरवले होते. संत दामाजीची कथा त्यांच्या मनात होती. परंतु तेव्हाचा काळ हा दुसऱ्या महायुद्धात होरपळून निघत होता. मानवता लोप पावत चालली होती? अशा वेळी मानवता आणि शांततेचा संदेश देणारा चित्रपट काढणं दामल्यांना जास्त कालानुरूप वाटलं. त्यातूनच ‘संत झानेश्वर’ची कथा आकार घेऊ लागली.’’ (प्रतिनिधी)
चेहऱ्यावरील सात्विक
तेजोभावासाठी मोडक यांचा उपवास
४संत ज्ञानेश्वर ज्या वेळी समाधी घ्यायला निघतात, त्या वेळी चेहऱ्यावर सात्विक तेजोभाव दिसण्यासाठी शाहू मोडकांनी तीन दिवस उपवास केला होता. संत ज्ञानेश्वर चित्रपटानंतर त्यांचे आयुष्यच बदलून गेले असल्याचे सांगितले जाते.
छोटा ज्ञानेश्वर
अचानक गवसला
४छोट्या ज्ञानेश्वरांच्या भूमिकेसाठी स्टुडिओत एक बालकलाकार काम शोधायला आला होता. ‘यशवंत निकम’ हे त्याचे नाव. त्याचे बोलके, भावूक डोळे आणि सात्विक दिसणं पाहून छोटा ज्ञानेश्वर गवसल्याची जाणीव सर्वांना झाली. यशवंत निकमच्या सख्ख्या भावंडांनी चित्रपटातील ज्ञानेश्वराच्या भावंडांची भूमिका लीलया पार पाडली.