पुणे : शहर पोलिस दलातील परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांची पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र पुणे शहर पोलिस आयुक्तांकडून जारी करण्यात आले. गृहविभागाने शुक्रवारी (दि. १६) रात्री २७ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. दरम्यान, मावळते पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना बढती मिळाली असून, त्यांची पुणे शहर पोलिस दलात अपर पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संदीपसिंह गिल्ल यांची बदली ५ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक म्हणून करण्यात आली होती. तर, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदली मुंबईला पोलिस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती. मात्र, सरकारच्या या निर्णयाविरोधात पंकज देशमुख यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (कॅट) धाव घेतली होती. त्यानंतर देशमुख यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली होती. परंतु, आता संदीपसिंह गिल्ल यांना शनिवार (दि. १७) पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळण्याचे निर्देश देण्यात आले. गिल्ल यांचा कार्यभार सध्या गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांच्याकडे सोपवण्यात आला असल्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
नोव्हेंबर २०२२ मध्ये गिल्ल यांनी पुण्यात उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. पुणे शहराच्या मध्यभाग आणि पेठांचा परिसर असणाऱ्या परिमंडळ १ च्या पोलिस उपायुक्तपदी त्यांची नियुक्त केली होती. गणेशोत्सव काळात परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त हे अतिशय महत्त्वाचे पद समजले जाते. गणेशोत्सवात त्यांनी केलेले कामकाज कौतुकास्पद होते. गेल्या वर्षी गणेशोत्सवात संदीपसिंह गिल्ल यांच्या नावाने देखावे देखील लागले होते. परिमंडळ १ मध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. मितभाषी अधिकारी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. पुण्यात काम करताना गिल्ल हे दबंग अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यासोबत त्यांनी अनेक महत्त्वाचे गुन्हे आणि आंदोलने देखील यशस्वीरीत्या हाताळले.