पोलीस ठाण्यातून पळवला वाळूचा ट्रक
By Admin | Updated: September 30, 2015 01:21 IST2015-09-30T01:21:45+5:302015-09-30T01:21:45+5:30
मंडल अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने ताब्यात घेऊन, इंदापूर पोलीस ठाण्यात जमा केलेला बेकायदा वाळू वाहतूक करणारा ट्रक पोलीस ठाण्यातून पळवला गेल्याचे उघडकीस आले आहे.

पोलीस ठाण्यातून पळवला वाळूचा ट्रक
इंदापूर : मंडल अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने ताब्यात घेऊन, इंदापूर पोलीस ठाण्यात जमा केलेला बेकायदा वाळू वाहतूक करणारा ट्रक पोलीस ठाण्यातून पळवला गेल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत खुद्द पोलीस निरीक्षकांकडून तहसील कार्यालयाला सांगितले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या ट्रक पळवला जाण्याच्या कथित प्रकरणासंदर्भात तत्काळ खुलासा करण्यात यावा. खुलासा वेळेत दिला नाही, तर जिल्हाधिकारी व पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना तसा सविस्तर अहवाल पाठविला जाईल, अशी तंबी पत्राद्वारे तहसीलदारांनी इंदापूरच्या पोलीस निरीक्षकांना दिली आहे.
तालुक्यातील अनधिकृत वाळू वाहतूक व उत्खनन रोखण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाने अनधिकृत वाळू वाहतूक करणारा ट्रक (एमएच ४२/टी ५१०७) ताब्यात घेऊन दि. २२ सप्टेंबर रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात जमा केला. ट्रकवर महसूल विभागाने कसलीही दंडात्मक कारवाई केली नव्हती. या पार्श्वभूमीवर, तो ट्रक पोलीस ठाण्यामधून पळवला गेला असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांकडून तहसील कार्यालयाला सांगण्यात आले. या प्रकारामुळे अनधिकृत वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस यंत्रणेचा वचक राहिलेला नाही, असा ठपका ठेवून शासनाच्या प्रमुख घटकांकडून अशी चूक होते, हे कायद्याच्या दृष्टीने योग्य नाही. पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे.
पोलीस यंत्रणेकडून कायद्याची पायमल्ली होत असेल, गुन्हेगारांना चरण्यासाठी आयते कुरण मिळत असेल तर आपणावरील विश्वासार्हता कमी होत असल्याचे दिसून येते, असे पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. याबाबत तहसीलदारांनी पोलीस निरीक्षकांकडे तत्काळ खुलासा मागितला आहे. (वार्ताहर)