गदिमांच्या स्मारकासाठी मराठीप्रेमी आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:38 IST2020-11-22T09:38:47+5:302020-11-22T09:38:47+5:30
पुणे : सिद्धहस्त लेखणीतून ‘गीतरामायण’ अजरामर करणारे आधुनिक वाल्मिकी गजानन दिगंबर उर्फ ग. दि माडगूळकर यांची येत्या १४ ...

गदिमांच्या स्मारकासाठी मराठीप्रेमी आंदोलनाच्या पवित्र्यात
पुणे : सिद्धहस्त लेखणीतून ‘गीतरामायण’ अजरामर करणारे आधुनिक वाल्मिकी गजानन दिगंबर उर्फ ग. दि माडगूळकर यांची येत्या १४ डिसेंबरला त्रेचाळीसावी पुण्यतिथी आहे. नुकत्याच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची देखील सांगता झाली. तरीही या महाकवीच्या स्मारकाला अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी या स्मारकासाठी उदासीनता दाखवली जात आहे. राजकारण्यांकडून दिल्या जाणाऱ्या पोकळ आश्वासनांच्या निषेधार्थ कलावंत, रसिक आणि मराठीप्रेमींनी अभिनव जनआंदोलन उभारण्याचे ठरविले आहे.
या आंदोलनात कोणतीही घोषणाबाजी नसेल. मात्र आंदोलनाचा भाग राज्यातल्या प्रत्येक शहरातील एकेक कलावंत गदिमांच्या कविता आणि गीतांचे वाचन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे. अमेरिका, इंग्लंड आदी देशांमध्येही हे आंदोलन केले जाणार आहे.
येत्या १४ डिसेंबरला टिळक चौकात आंदोलनाला सुरूवात होणार आहे. गदिमांचे पुत्र आनंद माडगूळकर आणि शीतल माडगूळकर हे कविता वाचनाने आंदोलनाला सुरूवात करणार असल्याची माहिती आंदोलनाचे संयोजक व कवी प्रदीप निफाडकर यांनी ’लोकमत’ला दिली. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्ष, संघटनेचे किंवा साहित्यिक वा नाट्य संस्थेचे नाही. हे फक्त कलावंताचे-रसिकांचे आंदोलन आहे. गदिमा हे साऱ्या महाराष्ट्राचे असल्याने आंदोलनही सगळ्यांचे आहे, असे ते म्हणाले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. सदानंद मोरे तसेच ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, पंडित विद्यासागर, प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते, डॉ. सुलभा मोहिते, भारत सासणे, स्पृहा जोशी, भाग्यश्री देसाई, डॉ.माधवी वैद्य, सुमित्र माडगूळकर, सूर्यकांत पाठक, रवीमुकुल, मंजिरी आलेगावकर, अॅड. असीम सरोदे, अनिस चिश्ती, अन्वर राजन, जनशाहीर दादा पासलकर, किशोर सरपोतदार, लीनता माडगूळकर आदी विविध क्षेत्रातील मंडळी आंदोलनात सहभागी होणार आहेत.
----------------------------------------------