अयोध्येतील राष्ट्रमंदिराच्या उभारणीत मालपाणी परिवाराच्या एक कोटी रुपयांची समिधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:11+5:302021-02-05T05:20:11+5:30
पुणे : श्रीराम हे आपल्या देशाचे प्राणतत्त्व आहेत. जेथे राम नाही, ते राष्ट्रच नाही. गेली पाच शतके या ...

अयोध्येतील राष्ट्रमंदिराच्या उभारणीत मालपाणी परिवाराच्या एक कोटी रुपयांची समिधा
पुणे : श्रीराम हे आपल्या देशाचे प्राणतत्त्व आहेत. जेथे राम नाही, ते राष्ट्रच नाही. गेली पाच शतके या देशातही राम नव्हता, आता त्या जन्मस्थळी जेव्हा राम विराजमान होतील तेव्हा राष्ट्रही आपोआप उभे राहील, असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी संगमनेर येथे केले.
स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची अयोध्येतील श्रीराम जन्मस्थळी उभ्या राहणाऱ्या मंदिराच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा संगमनेरकरांच्या वतीने नागरी सत्कार केला.
स्वामीजी म्हणाले की, गेल्या ५ ऑगस्ट रोजी त्याच जागी मंदिराचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भूमिपूजन झाले आणि आपल्या सर्वांच्या मनातून हरपलेला तो आत्मविश्वास पुन्हा एकदा निर्माण होत आहे.
प्रास्तविकात डॉ. संजय मालपाणी यांनी अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर राष्ट्रमंदिर व्हावे यासाठी जेव्हा राष्ट्रीय पातळीवर अशा व्यक्तीचा शोध सुरू झाला, तेव्हा अनेक गुणांनी मंडित असलेले गोविंद हे नाव पक्के झाले आणि स्वामीजींची श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे सांगितले.
मालपाणी परिवाराच्या वतीने या मंदिराच्या निर्मितीसाठी मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्या ललितादेवी व सुवर्णा मालपाणी यांच्यासह राजेश, डॉ. संजय, मनीष व गिरीश मालपाणी आणि संगीता, अनुराधा, रचना व सुनीता मालपाणी यांच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांचा धनादेश स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांना सुपूर्द करण्यात आला.
चौकट
सामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असलेल्या मालपाणी परिवाराने अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निधी संकलनातही आपल्या दातृत्वाचे दर्शन घडवले. या कार्यात तन-मन-धन समर्पित करीत मालपाणी परिवाराने एक कोटी रुपयांचा धनादेश स्वामी गोविंददेव गिरीजींच्या हाती सोपविला. या वेळी उपस्थितांनी उभे राहून मालपाणी परिवाराच्या दातृत्वाला टाळ्यांच्या गजरात सलाम केला. यापूर्वी मालपाणी परिवारातर्फे कोविडशी मुकाबला करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारलाही प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचा निधी दिला होता.
फोटो : संगमनेर श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या निर्मितीसाठी संगमनेर येथील मालपाणी परिवाराच्या वतीने १ कोटी रुपयांची देणगी देण्यात आली. याप्रसंगी (डावीकडून) दिव्या, रचना, अनुराधा, सुवर्णा, ललितादेवी, मनीष, राजेश, डॉ. संजय व गिरीश मालपाणी.
(फोटो : मालपाणी नावाने अभिजित लाॅगिनमध्ये)