नसरापूरला २ हजार क्विंटल तांदळाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2016 03:17 IST2016-02-14T03:17:15+5:302016-02-14T03:17:15+5:30
महाराष्ट्रात सुवासिक तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या नसरापूर येथील तांदूळ बाजारात या वर्षीच्या हंगामात आत्तापर्यंत झालेल्या बाजारातून दोन हजार क्विंटल तांदळाची विक्री

नसरापूरला २ हजार क्विंटल तांदळाची विक्री
नसरापूर : महाराष्ट्रात सुवासिक तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या नसरापूर येथील तांदूळ बाजारात या वर्षीच्या हंगामात आत्तापर्यंत झालेल्या बाजारातून दोन हजार क्विंटल तांदळाची विक्री झाली. प्रामुख्याने इंद्रायणी जातीच्या सुवासिक तांदळाला मोठी मागणी आहे.
नसरापूर येथील तांदूळ बाजारातील तांदळाला प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई व पुण्यातील ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे. येथील तांदूळ यापूर्वी नसरापूर गावठाणातील तांदूळआळीत भरत असे. बाजारात तांदूळ विक्रीसाठी आणताना बैलगाडीचा वापर होत होता. नसरापूर बाजारपेठेत येणारा तांदूळ प्रामुख्याने भोर तालुक्यातील तांभाड, हातवे, सोंडे, मोहरी, दीडघर, जांभळी; तर वेल्ह्यातील वांगणी खोऱ्यातील कोळवडी, मांगदरी, कातवडी, वांगणी, करंजावणे, मार्गासनी, वाजेघर, दामगुडास्नी, वेल्हा आदी गावातील तांदूळ ग्राहकांच्या पसंतीस उतरतो. तांदूळआळीतील तांदूळ बाजारात यापूर्वी वरंगळ, आंबेमोहर, रत्नागिरी २४ आदी जातींचे तांदूळ शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत. त्या वेळी आंबेमोहर तांदळाला विशेष मागणी होती. बाजारात जिकडे पाहावे तिकडे तांदळाच्या पोत्यांच्या थप्प्याच थप्प्या दिसत. यात्रेच्या हंगामातच खरी तांदळाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. पूर्वीच्या आंबेमोहर तांदळाची जागा आता सुवासिक व तुपट वासाच्या तांदळाने घेतली आहे. इंद्रायणी तांदळाच्या खालोखाल आता ग्राहक रत्नागिरी तांदळाला विशेष पसंती देतात. साधारणपणे इंद्रायणी तांदळापेक्षा या तांदळाचा भावही ७ ते ८ रुपयांनी कमी असतो. (वार्ताहर)
१९९० नंतर येथील तांदूळ बाजारपेठेचे स्थलांतर होऊन भोर बाजार समितीच्या उपबाजार जागेत तांदूळ बाजारात विक्रीला प्रारंभ करण्यात आला. या वर्षी ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला व मागणी असलेला इंद्रायणी तांदूळ साधारणपणे ३५ ते ३८ रुपये किलो दराने विकला जात असून, रत्नागीरी तांदळाची ३० ते ३२ रुपयांनी विक्री होत आहे. अत्यल्प उत्पादन होत असलेल्या आंबेमोहर तांदळाची विक्री होत आहे.
व्यापारी व ग्राहक तांदूळखरेदीसाठी बाजारात आल्याने चोखंदळपणे प्रतीनुसार तांदळाची खरेदी करता येते; याउलट आता शेतकरी आपला तांदूळ ग्राहकांना घरपोच पोहोचवू लागला आहे.
बाजारातील विक्रीबरोबरच तांदळाच्या मिलवरही विक्री केली जाते. भोर व वेल्हे या तालुक्यांतील यात्रांचा हंगाम सुरू झाला, की येथील शेतकरी तांदूळ त्वरित विक्रीस आणतो. भोर व वेल्हे या तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नसरापूर तांदूळबाजारात तांदूळखरेदीसाठी मोठी
गर्दी होते आहे.