पगार पालिकेचा, काम अधिकाऱ्याच्या घरचे
By Admin | Updated: September 8, 2015 04:50 IST2015-09-08T04:50:23+5:302015-09-08T04:50:23+5:30
महापालिकेत एके काळी मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्याची बदली होऊन ३ वर्षे उलटूनही त्या अधिकाऱ्याच्या घरी काम करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याची मात्र बदली झालेली नाही.

पगार पालिकेचा, काम अधिकाऱ्याच्या घरचे
पुणे : महापालिकेत एके काळी मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्याची बदली होऊन ३ वर्षे उलटूनही त्या अधिकाऱ्याच्या घरी काम करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याची मात्र बदली झालेली नाही. पगार महापालिकेचा व काम अधिकाऱ्याच्या घरचे, असा हा प्रकार महापालिकेत ३ वर्षांपासून सुरू आहे.
महापालिकेच्या उद्यान किंवा स्वच्छता विभागातील कर्मचारी म्हणजे आपल्या दिमतीला ठेवलेले सेवकच आहेत, असे बहुसंख्य वरिष्ठ अधिकारी समजतात. काही वर्षांपूर्वी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त असलेले नरेश झुरमुरे यांच्याकडेही घरकामासाठी म्हणून उद्यान विभागातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. कागदोपत्री मात्र या महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती पाषाण येथील संजय निम्हण उद्यानात बिगारी म्हणून दाखविण्यात आली. त्यांची हजेरी वगैरे सर्व सोपस्कार कागदोपत्रीच होतात व महापालिकेचे काम न करताही त्यांचे वेतनही नियमित होते.
झुरमुरे यांची सन २०१३मध्ये महापालिकेतून बदली झाली. त्यानंतर या महिला कर्मचाऱ्याला त्यांच्याकडून काढून घेणे आवश्यक होते. मात्र, त्यांची ही सुविधा आहे, तशीच आहे. यशदा या सरकारी प्रशिक्षण संस्थेत नियुक्ती झालेल्या झुरमुरे यांचे बाणेर रस्त्यावर निवासस्थान आहे. संबंधित महिला कर्मचाऱ्याला त्यांच्या या निवासस्थानी आजही घरकामे करावी लागतात. संबंधित महिला कर्मचारी भारतीय जनता पक्षाचे शिवाजीनगर विभागाचे माजी अध्यक्ष सुधीर आल्हाट यांच्या परिचयाच्या आहेत. आल्हाट यांनी याबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गत महापालिकेकडे माहिती मागवली. उद्यान विभागाकडून त्यांना याबाबत लेखी उत्तर देण्यात आले. आल्हाट यांनी आता या पत्राचा आधार घेऊन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे संबंधित महिला कर्मचाऱ्याचा ३ वर्षांचा पगार झुरमुरे व त्यांना ही सुविधा पुरवणाऱ्या महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल करावा, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर, महापालिकेचे कर्मचारी अशा किती व कोणत्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी कार्यरत आहेत, याची माहितीही त्यांनी मागवली आहे. (प्रतिनिधी)